सोलापूर : वंदे भारतचे तिकीट पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल | पुढारी

सोलापूर : वंदे भारतचे तिकीट पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल

सोलापूर : पुढारी वृत्‍तसेवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या एक्झिक्युटिव्ह क्लासची तिकिटे बुकिंग सुरू झाल्यानंतर काही तासांतच ती विकली गेली. विशेष म्हणजे आज (शुक्रवार) 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरून ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. एक्झिक्युटिव्ह क्लासला (EC) प्रवाशांनी प्रथम पसंती दर्शवली आहे. ट्रेनच्या पहिल्या दिवशीची 10 फेब्रुवारीची मुंबई-सोलापूर वंदे भारत प्रवाशांची यादी आधीच तयार करण्यात आली होती.

आज 10 फेब्रुवारी रोजी वंदे भारतचा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन सोहळा मुंबई येथे पार पडेल. या गाडीत काही शाळकरी मुले व त्यांचे पालक तसेच प्रसार माध्यमातील प्रतिनिधी व अनेक क्षेत्रातील मान्यवरांना तिकीट पासद्वारे प्रवासात समाविष्ट करण्यात आले आहे. 11 व 17 फेब्रुवारी रोजी सोलापूर-मुंबईसाठी एक्झिक्युटिव्ह क्लासची सर्व तिकिटे पहिल्‍याच दिवशी विकली गेली.

IRCTC वेबसाइटनुसार, 11 फेब्रुवारी सोलापूर-मुंबई दरम्यान चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्‍स्‍प्रेससाठी AC चेअर कारसाठी एकूण 900 जागा पैकी 748 जागा उपलब्ध आहेत. यासह, एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये एकूण 258 जागा आहेत. सोलापूर-मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करण्यासाठी चेअर कारसाठी सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना एसी चेअरसाठी 985 रुपये, तर जेवणासह 1300 रुपये तसेच एक्झिक्युटिव्ह चेअरसाठी 1993 रुपये, जेवणासह 2365 रुपये तिकिटाचे दर आकारले जात आहेत. या शुल्कात प्रवाशांना आरामदायी प्रवाशासह नाश्ता, जेवण, पाणी बॉटल देखील मिळेल. या गाडीला सोलापूर ते मुंबई प्रवासादरम्यान कुडुऻवाडी, पुणे, ठाणे, दादर येथे थांबे असतील.

साडेसहा तासात सोलापूररातून मुंबई टच  

वंदे भारत सुपरफास्ट ट्रेनमध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा असतील. वंदे भारत ट्रेन सोलापूर ते मुंबई हा प्रवास अंदाजे 6 तास30 मिनिटात पूर्ण करेल. वंदे भारत ट्रेन सोलापूर-मुंबई हा प्रवास इतर गाड्यांपेक्षा दोन तास आधी पूर्ण करेल. अशाप्रकारे उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि नवी दिल्ली येथे आधीच गाड्या धावत आहेत. पुढील तीन वर्षांत देशभरात अशा 400 गाड्या चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे.

हेही वाचा :   

Back to top button