नगर : अवैध दारुविरुद्ध पद्मश्री राहिबाईंचा एल्गार ! | पुढारी

नगर : अवैध दारुविरुद्ध पद्मश्री राहिबाईंचा एल्गार !

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  गावाची डोळ्यासमोर होणारी दुर्दशा महिलांच्या सहनशीलतेच्या पलिकडे गेली. गावची होणारी अधोगती पद्मश्री राहिबाई पोपेरेंसह महिलांना सहन झाली नाही. हळदी- कुंकूवाला जमलेल्या महिलांचं कुंकूच व्यसनाने पुसणार असेल तर नुसते हळदी- कुंकू लावण्याचा उपयोग नाही. ज्याच्या नावाने कुंकू लावायचे तोच संपणार असल्याचा विचार मनात येताच राहिबाई पोपेरे व महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या कोंभाळणे गावात अवैध दारु दुकानातील भरलेल्या बाटल्या फोडून दारूअड्डे उध्वस्त करीत रणरागीणींनी हल्लाबोल केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

दारू हे असे व्यसन आहे की, तिच्या आहारी गेलेले पुरुष कुटुंब, पत्नी अन् समाजाचाही विचार करीत नाही. सामाजिक भान गमावून समाजात व कुटुंबात अस्थिरता निर्माण करतात. असाच काहीसा गंभीर प्रकार पद्मश्री राहिबाई पोपेरे व महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचे मुळ गाव कोंभाळणेत सुरु होता. अवैध दारू व्यवसाय जोर धरत असताना अनेक कुटुंब देशोधडीला लागली. अनेकदा ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी एकत्र येत अवैध दारू व्यवसायाला जोरदार विरोध केला. अनेकदा गावाने ठरावही केले, परंतु मुठभर लोकांनी गावचे प्रयत्न हाणून पाडत खुलेआम दारू विक्री सुरू केली होती. गावातील तरुण व्यसनाधीन होत आहेत. अनेक महिलांचे ऐन तारुण्यात कुंकू पुसले. गावाची डोळ्यासमोर होणारी दुर्दशा महिलांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेली. होणारी ही अधोगती राहिबाई पोपेरे व गावातील महिलांना सहन झाली नाही. या महिलांना देशी दारूच्या बाटल्या रस्त्यावर फेकत चुराडा केला. यापुढे गावात दारू विक्री करताना कोणी दिसल्यास महिला ते सहन करणार नाहीत, हे निक्षूण सांगितले.

 

अनेकदा समज देऊन तसेच शासनाकडे विनंती करून गावातील अवैध दारू विक्री थांबली नाही. उलट महिलांची खिल्ली उडवत राजरोज राजरोस अवैध व्यवसाय जोर धरीत होता. गावात अनेक विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी , अभ्यासक , शास्त्रज्ञ गावरान बियाणांची बँक पाहण्यास येतात. त्यांच्यासमोर दारू विक्रीचा व्यवसाय होत असल्यामुळे गावची इज्जत चव्हाट्यावर येते. हे अत्यंत क्लेशदायी आहे. सर्वप्रकारे प्रयत्न करून थकल्यानंतर शेवटचे पाऊल म्हणून दीडशे महिलांसह स्वतः दारु दुकान फोडून दारु बाटल्या नष्ट केल्या. पुन्हा कोंभाळणेगावात अवैध दारुला थारा मिळणार नाही.
– पद्मश्री राहिबाई सोमा पोपेरे(कोंभाळणे, ता.अकोले,जि.अ. नगर)

 

अवैध दारुबंदीवर महिलांची वज्रमूठ !

हळदी- कुंकवानिमित्त एकत्र आलेल्या सुमारे दीडशे महिलांनी अवैध दारू व्यवसायाविरुद्ध एल्गार पुकारला. आपलेच कुंकू दारुच्या व्यसनाने पुसणार असेल तर नुसते हळदी- कुंकू करून काय उपयोग, असे म्हणत, ज्याच्या नावाने कुंकू लावायचे तोच व्यसनाने संपणार असेल तर अवैध दारू व्यवसाय करणारे अड्डे उध्वस्त केलेच पाहिजे, यावर सर्व महिलांचे एकमत झाले अन् हळदी- कुंकवाचा कार्यक्रम आटोपताच जोरदार घोषणाबाजी करीत अवैध दारु व्यवसाय करणार्‍या टपर्‍यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

 

Back to top button