कामे वेळेत अन् दर्जेदार व्हावीत! मुख्य अभियंत्यांनी घेतला जलजीवनचा आढावा | पुढारी

कामे वेळेत अन् दर्जेदार व्हावीत! मुख्य अभियंत्यांनी घेतला जलजीवनचा आढावा

नगर; पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशनच्या पाच कोटींपुढील योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविल्या जात आहे. मात्र, या योजनांची श्रेयवादाची लढाई सुरूच आहे, एकाच योजनांची दोन-दोन उद्घाटने केली जात आहे. याशिवाय काही कामांविषयी तक्रारींचा सूरही आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी नुकतीच नगर दौर्‍यावर येवून काही योजनांच्या कामांची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता वारे यांना निकृष्ठ कामांच्या तक्रारी येता कामा नये, तसेच मुदतीत आणि दर्जेदार कामे व्हायला हवीत, अशा सूचना केल्याचे सूत्रांकडून समजले.

देशभरात जलजीवन मिशन जोरात सुरू आहे. नगर जिल्हा परिषदेकडे 829 योजना आहेत, त्यासाठी 1350 कोटींपेक्षा अधिक तरतूद केलेली आहे. यातील काही कामे सुरू आहेत, काहींची वर्कऑर्डर झाली आहे, तर काहींची कामे सुरू होणे बाकी आहे. याशिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाच कोटींपेक्षा अधिक रक्कमेच्या योजना आहेत.

जीवन प्राधिकरणचे कामात सूसुत्रता आणण्यासाठी संगमनेर आणि नगर अशा विभागातून ही कामे केली जात आहेत. नगर विभागात तीन उपविभाग आहेत. यात नगर उपविभागात नगर, कर्जत, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा अशा पाच तालुक्यांत 26, नेवासा उपविभागातील नेवासा, शेवगाव, पाथर्डी या तीन तालुक्यांत 14 आणि श्रीरामपूर उपविभागातील श्रीरामपूर, राहुरी आणि राहाता तालुक्यात 17 अशाप्रकारे नगर अंतर्गत 57 पाणी योजना राबिवल्या जात आहेत. त्यासाठी साधारणतः 2250 कोटींपेक्षा अधिक तरतूद केलेली आहे.

तर संगमनेरकडे 54 योजना असून त्यासाठी 1200 कोटींपेक्षा अधिक तरतूद आहे. नगर विभागातील 57 योजनांपैकी 39 योजनांचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले आहे. गत आठवड्यातच काही कार्यारंभ आदेश झालेले आहेत, त्या योजनांची कामेही आठवडाभरात सुरू होणार आहेत. तर, संगमनेर विभागात 42 कामे सुरू झालेली आहे.

मात्र यातील काही कामे सुरू होण्यापूर्वी आणि सुरू झाल्यानंतर तक्रारी सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी टाकीच्या पायाची कामे निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत, तर कुठे गावांतर्गत वापरला जाणारा पाईप असेल, किंवा पाईपलाईनची खोली असेल, याविषयी कार्यकारी अभियंता वारे यांच्याकडे तक्रारी येत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांचे या कामांवर नियंत्रण नसल्याने पाणी योजनांचे ठेकेदार, अधिकारी विरोधात ग्रामस्थ वाद चिघळण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान, शुक्रवारी नाशिक विभागाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ हे नगरला आले होते. त्यांनी कार्यकारी अभियंता वारे, मुळे यांच्याकडून जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला. तसेच भगवानगड पाणी योजनेसंदर्भात त्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली, जलशुद्धीकरण केंद्र, गावात कशाप्रकारे पाणी पोहचणार, याचीही माहिती जाणून घेत काही सूचनाही केल्या. यावेळी निकृष्ट कामांच्या तक्रारी येता कामा नये, असेही त्यांनी सुनावल्याचे समजले.

आज कोणीही नगरला फिरकू नका!
मुख्य अभियंता भुजबळ हे नगरला येणार असल्याने ते अचानक कोणत्याही योजनेची पाहणी करण्याचा निर्णय घेवू शकतात, त्यामुळे नगरच्या कार्यालयात कोणीही येऊ नये, त्यांनी आपापल्या योजनांच्या ठिकाणीच थांबावे, अशी खबर कानोकान पोहचविण्यात आल्याचे समजले. या सुचनांमुळेच शुक्रवारी दिवसभर जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला.

नाशिक विभागीय मुख्य अभियंता भुजबळ हे नगरला आले होते. त्यांनी योजनांचा आढावा घेतला. तसेच भगवान गड योजनेचीही माहिती जाणून घेतली. त्यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या. निकृष्ट काम होऊ नये, याबाबत आमच्याकडूनही खाली सूचना केल्या जात आहेत.

                                                                -शाम वारे,
                                                  कार्यकारी अभियंता, म.जी.प्रा.

Back to top button