सांगली : विट्यात मंगळवारी पासून शालेय राज्यस्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धा | पुढारी

सांगली : विट्यात मंगळवारी पासून शालेय राज्यस्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धा

विटा; पुढारी वृत्तसेवा : शालेय राज्यस्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेचे यजमानपद यंदा सांगली जिल्ह्याकडे आले असून येत्या ७ फेब्रुवारीपासून विट्यात स्पर्धा सुरू होत आहे. अशी माहिती तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी दिली आहे.

याबाबत तहसीलदार शेळके म्हणाले की, पुण्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, सांगली, तहसिलदार कार्यालय, विटा आणि बळवंत कॉलेज, विटा यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा (१९ वर्षे मुले व मुली) आयोजित करण्यात आलेल्या आहेत. येत्या मंगळवारपासून ७ ते ९ फेब्रुवारी रोजी बळवंत कॉलेज येथील विटा-खानापूर येथे घेण्यात येणार आहेत.

या क्रीडा स्पर्धेचा उदघाटन समारंभ बुधवारी, ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०६.०० वाजता होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबईसह नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे व यजमान कोल्हापूर विभागातील विविध जिल्हातून २८० ते ३०० खेळाडू मुले, मुली तसेच पंच, व्यवस्थापक सहभागी होणार आहेत. सहभागी खेळाडू व संघव्यवस्थापक क्रीडा मार्गदर्शकांची निवास व्यवस्था बळवंत कॉलेजच्या वसतिगृहामध्ये करण्यात आली आहे. तसेच स्पर्धेसाठी उपस्थित निरिक्षक, पदाधिकारी व पंच यांच्या निवासाची व्यवस्था बळवंत कॉलेज आणि शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आली आहे.शिवाय सहभागी खेळाडू, संघव्यवस्थापक, निरिक्षक, पदाधिकारी व पंच यांची भोजनाची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे असेही तहसीलदार शेळके यांनी सांगितले आहे.

Back to top button