पुणे : पाणीकोट्याच्या मागणीला पालिकेची कात्री | पुढारी

पुणे : पाणीकोट्याच्या मागणीला पालिकेची कात्री

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहराच्या लोकसंख्येचा विचार करून शहरासाठी 20.34 टीएमसी पाण्याची मागणी करणार्‍या महापालिकेने आपल्याच कोट्याला कात्री लावत 16.52 टीएमसी पाण्याची मागणी पत्राद्वारे जलसंपदाकडे केली आहे. तसेच औद्योगिक वापराच्या दरानुसार आम्ही बिल भरणार नाही, घरगुती वापराच्या दरानुसार बिल पाठवावे,  अशीही मागणी केली आहे.

महापालिका हद्दीत समावेश झालेली गावे आणि शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन महापालिका प्रशासनाने 2022-23 साठी पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले आहे. हे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाला सादर करून 20.34 टीएमसी पाण्याची मागणी केली होती. त्यावर जलसंपदा विभागाने महापालिकेला फक्त 12.41 टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर केला. तसेच जास्तीचे पाणी हवे असेल तर त्यासाठी तीन पट दर द्यावा, असेही  म्हटले होते. यानंतर आता महापालिकेने पुन्हा सुधारित पत्र पाठवून पाणी वापराची वर्गवारी देत जलसंपदा विभागाकडे 16.52 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. याबाबतचे पत्र महापालिकेने बुधवारी जलसंपदा विभागाला दिले आहे.

घरगुती वापराच्या दरानेच बिल द्या

शहरासाठी महापालिकेकडून खडकवासला धरणातून उचलल्या जाणार्‍या पाण्यासाठी जलसंपदाकडून औद्योगिक वापरानुसार सरसकट किलो लिटर 11 रुपये दर आकारला जातो. यानुसार जलसंपदाने महापालिकेला दोन महिन्यासाठी 33 कोटीचे बिल दिले आहे. हे बिल प्रक्रिया उद्योगांना दिल्या जाणार्‍या पाण्यासाठी आकारले जाते. मात्र, जलसंपदाकडून घरगुती वापराच्या पाण्यासाठी औद्योगीक वापराचे बिल लावले जाते. त्यामुळे घरगुती वापराचे बिल पाठवण्याची मागणी पत्राद्वारे जलसंपदाकडे केल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. घरगुती वापराच्या पाण्याचा दर पर किलो लिटर 55 पैसे असल्याचे बिलाची रक्कम मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचेही सांगण्यात आले.

महापालिकेने मागितलेला दुरुस्त पाणीकोटा…
घरगुती वापर ः 10.69 टीएमसी
समाविष्ट गावे ः 0.99 टीएमसी
फ्लोटिंग लोकसंख्या ः 0.12 टीएमसी
टँकरद्वारे पाणी ः 0.03 टीएमसी
शैक्षणिक, व्यावसायिक व औद्योगिक
(घरगुती) ः 1.39 टीएमसी
वहन घट (20 टक्के) ः 3.31 टीएमसी
एकूण 16.52 टीएमसी

 

Back to top button