नगर : महिलेचा विनयभंग; आरोपीस सक्तमजुरी | पुढारी

नगर : महिलेचा विनयभंग; आरोपीस सक्तमजुरी

नगर; पुढारी वृत्तसेवा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश एन.आर. नाईकवाडी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. कैलास दत्तात्रय गर्जे (रा.गर्जेवस्ती, पाडळी, ता.पाथर्डी) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला शेतात काम करण्यासाठी आलेली असताना आरोपीने महिलेचा विनयभंग केला होता. आरोपी हा त्यांचा ट्रक्टर घेऊन पीडितेच्या शेतात पेरणी करून देण्यासाठी आला होता.

पेरणीचे पैसे किती झाले असे पीडित महिलेने विचारल्यानंतर त्याने तीन हजार झाल्याचे सांगितले. मात्र, मला पैसे नको असे म्हणून महिलेचा विनयभंग करत दमदाटी केली. तसेच महिलेचा भाऊ व मुलगा यांना देखील आरोपीने दमदाटी केली होती. पाथर्डी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक वाय.एस.राक्षे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील अ‍ॅड. सी.डी.कुलकर्णी यांनी पाहिले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम.ए.थोरात व ए.आर.भिंगारदिवे यांनी सहकार्य केले.

Back to top button