रत्नागिरी : पुतळा की माणूस..? | पुढारी

रत्नागिरी : पुतळा की माणूस..?

चिपळूण; समीर जाधव :  कोणी जवळ येऊन काठी हलवत आहे… कोणी हात लावण्याचा प्रयत्न करतोय तर कोणी एखादी काडी घेऊन टोचून पाहतोय… कोणी हा पुतळाच आहे, असे बोलून केवळ एक नजर टाकून पुढे सरकतोय असा अनुभव चिपळूणमधील फन- एन्- फेअरमध्ये येतोय. हा ‘माणूस की पुतळा’ हा प्रश्न सर्वांनाच पडतोय.

शहरातील रोट्रॅक्ट क्लबच्या वतीने खंड येथील मैदानावर फन-एन्-फेअर चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुप येथे येणाऱ्या
सर्वांचीच मने जिंकत आहे. या संदर्भात या ग्रुपचे मनोज कल्याणकर यांना विचारले असता ते म्हणाले, वीस ते बावीस वर्षांपूर्वी ही कला जोपासण्यास आपण प्रारंभ केला. बांदा येथील काही लोकांकडून दीपावली शोचे आयोजन केले जायचे. या निमित्ताने फॅन्सी ड्रेस स्पर्धा तसेच स्टॅचू स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. या स्पर्धेत आपण सातत्याने भाग घेत गेलो आणि तब्बल ११ वेळा स्पर्धेत आपण पहिला क्रमांक पटकावला. मात्र, काही वर्षांनी हा कार्यक्रम बंद पडला. या नंतर आपण स्टॅच्यू करणाऱ्या अनेक मुलांना एकत्रित केले आणि तीस मुलांचा अलाईव्ह स्टॅचू ग्रुप बांदा तयार केला. बांदा ते चांदा ही कला प्रदर्शित करण्याचा मानस केला.

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच चिपळूणमध्ये ही कला सादर होत आहे. याआधी पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग अन्य ठिकाणी सादरीकरण केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे येथे तब्बल १२ तास जिवंत पुतळा करण्याचे रेकॉर्ड आमच्या ग्रुपने केले आहे. मात्र, आता सहा ते आठ तासापर्यंत जिवंत पुतळा करण्यात आमचा हातखंड आहे. अनेकवेळा बघणाऱ्यांना प्रश्न पडतो हा पुतळा मातीचा, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा असावा. मात्र, जिवंत मानवी पुतळा असल्याचे लक्षात येताच अनेकजण नवल व्यक्त करतात, तर काही शंका घेतात. असेही मनोज कल्याणकर म्हणाले.

Back to top button