नगर : देशी दारू दुकानाविरोधात महिला आक्रमक | पुढारी

नगर : देशी दारू दुकानाविरोधात महिला आक्रमक

 संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे देशी दारू दुकानाला ग्रामपंचायत प्रशासनाने परवानगी दिली असल्याने गावातील तरुण चांगलेच आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या तरुणांनी ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामविकास अधिकारी नागरे यांना जाब विचारला असता ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांनीच त्या विषयाला संमती दिली असल्याचे ग्रामविकास अधिकारी सुनील नागरे यांनी सांगितले.यानंतर ग्रामविकास अधिकारी व आंदोलनकर्ते तरुण यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे गावाच्या पुर्वेला कोल्हार- घोटी राज्य मार्गावर देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली असल्याचे देवा शेरमाळे यांना समजले.

त्यांनी गावातील तरुणांना व महिलांना एकत्रित करीत ग्रामपंचायत मध्येच जाऊन ग्रामविकास अधिकारी सुनील नागरे यांना धारेवर धरत ‘गावात तुम्ही देशी दारूच्या दुकानाला कुणाच्या सांगण्यावरून परवानगी दिली, याचे आम्हाला उत्तर द्या’ अशी आक्रमक भूमिका देवा शेरमाळे, बापू दळवी, मोहसीन शेख, रियाज शेख, शिवाजी शेरमाळे, ईरफान पठाण, अशोक चांडे, साजिद शेख, भागवत शेरमाळे, विठ्ठल शेरमाळे यांच्यासह अनेक तरुणांनी व महिलांनी घेतली. यावर ग्रामसभेत सरपंच व इतर सदस्यांसमोर हा विषय घेण्यात आला त्यानंतर त्यास ग्रामसभेत सर्वांनीच परवानगी दिली असल्याचे ग्रामविकास अधिकारी नागरे यांनी सांगितले.

‘आम्हाला दारू नको, पाणी हवे’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी देवा शेरमाळे यांनी ग्रामपंचायतीने आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता परस्पर ठराव केलेले आहे. हे ठराव रद्द करण्यात यावे आणि गावात कुठल्याही प्रकारचे दारूचे दुकान आम्ही सुरू होऊ देणार नसल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. जर गावामध्ये देशी दारूचे दुकान सुरू झाले तर आम्ही बायका मुलाबाळांसह महिला ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळ दिलेला आहे.

ग्रामपंचायत सदस्य विश्वासात घेत नाही
संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात अनेक ग्रामपंचायत सदस्यांचे देशी दारूची दुकाने आहेत. त्यास तुम्ही विरोध का करीत नाही, असे पत्रकारांनी सरपंच कमल बर्डे यांना विचारले असता ‘सदस्य मला कधीच विश्वासात घेत नाही, मी चांगले काम करायला लागले लागले की, अडथळे आणत असतात. माझ्या अडाणीपणाचा ते फायदा उचलत आहे. मी दोन वर्षात कुणाकडूनही पैसे घेतले असेल तर ते त्यांनी दाखवून द्यावे, अनेक निर्णय करताना ते परस्पर करतात. माझ्या फक्त सह्या घेतात’ असा आरोप समनापुरच्या महिला सरपंच कमल बर्डे यांनी दैनिक ‘पुढारी’ शी बोलताना आपल्याच ग्रामपंचायत सदस्यांवर केला आहे.

Back to top button