IND vs NZ : न्यूझीलंडचा भारतावर २१ धावांनी विजय | पुढारी

IND vs NZ : न्यूझीलंडचा भारतावर २१ धावांनी विजय

रांची; वृत्तसंस्था : वन-डे मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवलेल्या भारतीय संघाला टी-20 मालिकेत पहिल्याच सामन्यात झटका बसला. रांची येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 21 धावांनी हरवले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 176 धावा केल्या. त्यानंतर भारताला त्यांनी 155 धावांत रोखले. (IND vs NZ)

झारखंडमधील रांची येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताने पहिल्या तीन विकेटस् अवघ्या 15 धावांत गमावल्या. शुभमन गिल 7, इशान किशन 4 तर राहुल त्रिपाठी शून्यावर बाद झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनी दहाच्या धावगतीने अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी ईश सोढीने सूर्यकुमार यादवला (47) झेलबाद केले. पुढच्याच षटकांत हार्दिक पंड्याने (21) ब्रेसवेलकडे रिटर्न कॅच दिला. (IND vs NZ)

यानंतर वॉशिंग्टन सुंदरने विजयासाठी शर्थीची झुंज दिली; परंतु तोही 50 धावांवर बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाची विजयासाठीची धडपड 155 धावांवर संपुष्टात आली. न्यूझीलंडकडून ब्रेसवेल, सँटनेर आणि फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या.

तत्पूर्वी, हार्दिकने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने पहिल्या चार षटकांमध्ये एकही विकेट न गमावता 40 धावांपर्यंत मजल मारली होती, पण त्यानंतर सुंदरने न्यूझीलंडला पाचव्या षटकात एकामागून एक धक्के दिले. सुंदरने दुसर्‍या चेंडूवर फिन एलनला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. फिनने यावेळी 23 चेंडूंत 35 धावांची दमदार खेळी साकारली होती. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सुंदरने न्यूझीलंडला अजून एक मोठा धक्का दिला. सुंदरने यावेळी मार्क चॅपमनला एकही धाव करू न देता शून्यावर बाद केले. त्यामुळे न्यूझीलंडची बिनबाद 43 वरून 2 बाद 43 अशी अवस्था झाली होती.

चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने ग्लेन फिलिप्सला बाद केले आणि भारताला तिसरे यश मिळवून दिले. ग्लेनला यावेळी 23 चेंडूंत 17 धावा करता आल्या. भारतीय फिरकीपटू एका बाजूने तिखट मारा करत असले तरी न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे हा वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत होता. एका बाजूने विकेट पडत असताना कॉन्वेने संघाची दुसरी बाजू लावून धरली आणि आपले अर्धशतकही पूर्ण केले. कॉन्वेच्या या खेळीमुळेच न्यूझीलंडला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. कॉन्वेने 31 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर आपले अर्धशतक पूर्ण केले, पण अर्शदीप सिंगने त्याला 52 धावांवर असताना बाद केले आणि भारताला मोठा दिलासा मिळाला.

डॅरेल मिचेलने 30 चेंडूंत नाबाद 59 धावा करत चांगली साथ दिली. मिचेलने अर्शदीपच्या शेवटच्या षटकात 27 धावा चोपल्या. अर्शदीपने षटकाचा पहिलाच चेंडू नो बॉल टाकला होता. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 22 धावांत 2 बळी घेतले.

हेही वाचा;

Back to top button