तरुणांनी देशाच्या संरक्षण दलात जाण्यासाठी रायगड जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे व्रत | पुढारी

तरुणांनी देशाच्या संरक्षण दलात जाण्यासाठी रायगड जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे व्रत

रायगड : जयंत धुळप – सरकारी अधिकाऱ्यांवर शासकीय नियंमांच्या मर्यादांची चौकट असते. परंतु, या चौकटीत राहून देखील चौकटीच्या पलिकडचे काम करता येउ शकते, हे रायगड जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्यरत मनोज शिवाजी सानप यांनी तरुणाईला देशाच्या संरक्षण दलात दाखल होण्याकरिता प्रेरीत करण्याकरिता स्वेच्छेने स्वीकारलेल्या अनोख्या व्रतातून सिद्ध करुन दाखविले आहे. या त्यांच्या व्रताच्या जन्माची आणि आजवरच्या यशाची कहाणी अत्यंत रोचक अशीच आहे.

रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याशी संवाद साधनाने ते म्हणाले, २६ सप्टेंबर, १९९५ चा तो दिवस एका माऊलीच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस म्हणून ओळखला जाईल. त्याचं कारण असं, की, त्या मातेने आपला एकुलता एक मुलगा गमावला. मात्र अभिमानही आहे की, त्या मुलाने देश रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली. ऑपरेशन रक्षक मध्ये एका सर्च ऑपरेशनच्या वेळी कॅप्टन विनायक विष्णू गोरे या अवघ्या वयाच्या २४ व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले. याबाबतची वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी माझ्या वाचनात आली. त्यावेळी मी के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स विद्याविहार येथे तृतीय वर्षात होतो. बातमी वाचल्यानंतर मन हेलावून गेलं. मी एनसीसी कॅडेट होतो. के.जे.सोमय्या कॉलेजचा सीनियर अंडर ऑफिसर या रँकवर मी त्यावेळी काम करत होतो.

देश प्रेमाबद्दल घरगुती विचारांमधूनच धडे मिळालेलेच होते. माझे वडील स्वर्गीय शिवाजी रुंझा सानप आणि आई सुमन शिवाजी सानप हे दोघेही शिक्षक. यांच्या संस्कारातून देशप्रेम, शिस्त बाकी गोष्टींची आपोआपच सवय झालेली होती. यातूनच माझ्यात सुद्धा सैन्यात अधिकारी बनण्याचं एक स्वप्न होतं, एक ध्येय होतं.

काही क्षण थांबून सानप पुढे म्हणाले, शहीद कॅप्टन विनायक गोरे यांची बातमी वाचल्यानंतर मन दु:खी झाले. देश रक्षणासाठी, देशासाठी आपणही काहीतरी करायला हवं. योगायोगाने कॉलेजमध्ये एकपात्री अभिनय स्पर्धा होती. मनामध्ये शहीद कॅप्टन विनायक गोरे यांचे विचार, त्यांच्या आईची प्रतिक्रिया, वीरमाता अनुराधा विष्णू गोरे. माझ्यासाठी सुद्धा त्या आईच. त्या माऊलीचे विचार मनामध्ये चालूच होते आणि तिथूनच मला प्रेरणा मिळाली. त्या एकपात्री अभिनयामध्ये मी माझं सादरीकरण केलं, जमेल तसं केलं. तो माझा पहिला प्रयोग.

अर्थातच कुठलीही तयारी न करता मी त्या स्पर्धेत उतरलो होतो, फक्त भावनांच्या बळावर. त्या अभिनय स्पर्धेत मला पारितोषिक मिळालं नाही. परंतु समोर जे कॉलेजचे तरुण-तरुणी होते, त्यांनी मलाही बक्षीस मिळावं यासाठी अख्खं सभागृह डोक्यावर घेतलं. त्यावेळी मला माझ्या त्या शहीद कॅप्टन विनायक गोरे या एकपात्री अभिनयाच्या पहिल्या प्रयोगाकरिता फक्त विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उत्तेजनार्थ विशेष पारितोषिक देण्यात आले.

त्या पारितोषिकापेक्षा त्या वीरमातेचे बलिदान, एकुलता एक मुलगा गमावण्याचे दुःख यांनी मी व्यथित झालो होतो. त्यावेळी माझे प्राध्यापक अनंत भावे सर यांनी मला प्रेरणा दिली. त्यांनी मला सांगितलं की, मनोज तू जे काय केलं ते निश्चित चांगलं केलंस आणि याचा तू समाजासाठी प्रेरणादायी उपयोग करू शकतोस. त्या पद्धतीने विचार कर आणि त्याप्रमाणे कर. त्यावेळी मी तितकसं खूप सिरियसली घेतलं नाही. परंतु, मी जिथे राहतो देवनार मुन्सिपल कॉलनी, चेंबूर, मुंबई. त्या ठिकाणी मी एका बिल्डिंगच्या पुजेच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमात माझा दुसरा प्रयोग सादर केला. तो प्रयोग सादर करीत असताना मला उपस्थित प्रेक्षकांकडून अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. माझ्या लक्षात आलं की, मी जे सादर करतोय ते निश्चितच लोकांना प्रेरणादायी ठरतेय.

त्यानंतर दुसऱ्या बिल्डिंगच्या पूजेच्या कार्यक्रमात, तिसऱ्या बिल्डिंगच्या पूजेच्या कार्यक्रमात असं करत करत माझ्या कार्यक्रमांची संख्या वाढू लागली. माझ्या लक्षात यायला लागलं की, माझे सादरीकरण लोकांना आवडते. लोकांना हे समजतंय. विशेष म्हणजे मी हा जो काही एकपात्री अभिनय करतो याचं एक अक्षरही लिहिलेलं नाही. जे येतंय ते उत्स्फूर्तपणे, वीरमाता अनुराधा विष्णू गोरे आणि शहीद कॅप्टन विनायक गोरे यांना नेहमी स्मरणात ठेऊन मी त्या विषयावर माझ्या एकपात्री अभिनयाचे सादरीकरण करतो. आतापर्यंत त्याचे जवळपास साडेचार हजार पेक्षा जास्त प्रयोग पूर्ण झाले असल्याचे सानप यांनी सांगितले.

मी एका ध्येयाने हे करतो. कारण मुळात मलाच सैन्यात अधिकारी बनण्याची ओढ होती. ध्येय होतं. प्रयत्न खूप केले. काही कारणास्तव माझं सिलेक्शन झालं नाही. परंतु आपल्या वीर जवानांच्या बलिदानाला स्मरून शासकीय सेवेत सुद्धा आपण लोकांसाठी, देशासाठी, समाजासाठी काम करायला हवं ही प्रेरणा माझी दुसरी आई असं म्हणून मी अनुराधा गोरे मॅडम, शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्यासारख्या अनेक शहीद जवानांच्या-अधिकाऱ्यांच्या स्मृतीस स्मरून आणि माझ्या आई-वडिलांचा मला मिळालेला आशिर्वाद या सगळ्यांमधून हा प्रयोग मी करण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच याला साथ माझ्या पत्नी सौ. रेखा मनोप सानप यांची आणि विशेष म्हणजे माझा आता इंडियन नेवल अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेला माझा मुलगा धनुष मनोज सानप आणि माझी नववीत शिकत असलेली मुलगी नक्षत्रा मनोज सानप यांचीही खूप मोलाची साथ मिळते. या सगळ्यांच्या साथीने मी हा प्रयोग करतोय, असेही सानप यांनी सांगितले.

प्रेरणा एकच की, मी सैन्यात जरी नाही जाऊ शकलो, तरीसुद्धा मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून माझ्या देशाची माझ्या समाजाची, मी सेवा करू शकेन आणि ती सेवादेखील देशासाठी आणि समाजासाठी तितकीच उपयुक्त असायला हवी, या भावनेने मी हे काम करतो. त्या भावनेने मी हे सादरीकरण करतो. जवळपास दहा ते बारा मिनिटांचे हे सादरीकरण आहे. वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये, विविध कार्यक्रम या ठिकाणी संधी मिळाल्याबरोबर मी हे सादरीकरण करतो. मुख्य हेतू हाच आहे की, या सादरीकरणातून तरुणांनी देशसेवेसाठी पुढे यावं. सैन्यात जाण्यासाठी प्रयत्न करावेत आणि ज्यांना सैन्यात जायला जमणार नाही किंवा शक्य होणार नाही त्यांनी आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या पदावर आहोत, ज्या क्षेत्रात आहोत, त्या क्षेत्रात राहून सुद्धा आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी आपलं थोडं तरी कॉन्ट्रीब्युशन द्यावं आणि स्वतःला मानवी जन्म प्राप्त झालेला आहे त्याचे सार्थक करावे.

शेवटी देशप्रेम हेच सर्वोच्च असायला हवं. या वैयक्तिक मताचा मी आहे. देशापेक्षा मोठं काहीही नाही. पहिला देश आणि मग बाकी सर्व काही, या प्रेरणेनी मी तरुणांना प्रेरित करतोय. काही अंशी मी यशस्वी ठरतोय. बरेच तरुण माझ्या या सादरीकरणाच्या प्रेरणेतून सैन्यात जाण्यासाठी प्रयत्न करतात. काही लोकांचे, काही युवकांचे ते प्रयत्न सफल झालेले आहेत. मी त्यांना माझ्या परीने जितके जमेल तितके मार्गदर्शन करतच असतो, असा अनुभव त्यांनी सांगितला.

या सगळ्या एकूणच प्रवासामध्ये मी याबद्दलचे कुठलेही कॉपीराईट ठेवले नाही. जसा हा मी प्रयोग करतो तसा मी प्रेक्षकांनाही आवाहन करतो की, तुम्ही देखील हा प्रयोग तुमच्या पद्धतीने सादर करू शकता. ज्याच्यातून हा प्रयोग अनेक लोकांपर्यंत पोहोचेल. पण त्या प्रयोगापेक्षा त्याच्यातली जी भावना आहे, देश प्रेमाची, समाजसेवेची ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, हा त्याच्यामागचा प्रामाणिक हेतू आहे. यासाठी मला माझा विभाग माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, माझं पूर्वीचे कार्यालय अधिदान व लेखा कार्यालय, माझे कुटुंबीय, माझे गुरुवर्य, माझे मित्रमैत्रिणी,माझे पत्रकार स्नेही, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून हे सादरीकरण करायला प्रोत्साहन दिलं जातं.

मला बळ दिले जाते. मी या सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे. मी पुन्हा एकदा आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदान केलेल्या शहीद जवानांना-अधिकाऱ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आपलं सर्वांचंही मनःपूर्वक धन्यवाद मानतो, आभार मानतो, असे सानप यांनी नम्रपणे सांगितले.

Back to top button