पिंपरी : घंटागाड्यांची धून पडली बंद ; नागरिकांमध्ये नाराजी | पुढारी

पिंपरी : घंटागाड्यांची धून पडली बंद ; नागरिकांमध्ये नाराजी

नवी सांगवी : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्याची धून घंटागाडीवर लावण्यात आली होती. मात्र नवी सांगवीतील अनेक घंटागाड्यांची गेली काही महिने धून बंद पडली आहे. काही गाड्यांवर गेल्या पाच महिन्यापासून ही धून बंद पडली आहे, वारंवार संबंधित अधिकार्‍यांना तक्रार करूनही येथील नागरिकांना याबाबत केराची टोपली दाखविण्यात येत आहे.
नवी सांगवी येथील समता नगर, संत तुकाराम नगर, महाराष्ट्र कॉलनी, भारत बेकरी, टॉवर रोड आदी परिसरात दररोज महापालिकेची घंटा गाडी कचरा गोळा करण्यासाठी येत असते. येथील परिसरात एम एच 14 एच यू 0312 हे घंटागाडी वाहन या परिसरात सध्या कर्कश असा हॉर्न वाजवत कचरा गोळा करण्यासाठी येत असते. याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे.

नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात अनेक ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या घंटागाड्या सकाळी सकाळी मुख्य रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर दररोज फिरत असतात. नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा या गाड्यांची धुण ऐकून सवय झाली होती. त्यामुळे नागरिक ही धून कानी पडताच कचरा घेऊन घराबाहेर पडत असत. मात्र गेली पाच महिने या घंटागाडी वाहनाची धून बंद पडल्याने वाहन चालक हॉर्नचा कर्कश आवाज करीत परिसरात येत आहे.

सकाळी सकाळी शाळेची वाहने, परिसरातील इतर वाहने यांचीही वर्दळ सुरू असते. यावेळी ही वाहनेही हॉर्न वाजवत जात असतात. अनेकदा हॉर्न वाजविल्याने घंटागाडी आल्याचा भास निर्माण होत असल्याने नागरिक कचरा घेऊन घराबाहेर पडत असतात. घंटागाडी नसल्याचे पाहून परत जात असतात. गेल्या पाच महिन्यापासून याचा नाहक त्रास येथील नागरिक सहन करीत आहेत. येथील घटगाडीच्या वाहनास उजव्या व डाव्या बाजूस आरसे नसताना वाहन चालक वाहन चालवीत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे एखाद दिवस घंटागाडीच्या मागच्या चाकाजवळ जाऊन महिला नागरिक कचरा टाकत असताना वाहन चालकाने अचानक वाहन पुढे सरसावल्यास अपघात होऊन दुर्घटना घडून येऊ शकते.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथील परिसरातील घंटागाडीची धून त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी परिसरातील मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केली आहे.

मात्र, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष…
यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले की महिन्याभरापूर्वीच आयुक्तांनी स्वच्छता बाबतीत पालिकेचा 19 व्या क्रमांकावरून पहिला क्रमांक येण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवला आहे. विविध संघटना व नागरिकांना स्वच्छता चॅम्पियन म्हणून आयुक्तांनी सन्मानितही केले आहे. मात्र, येथील परिसरात महापालिकेचे आरोग्य विभागच याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Back to top button