सातारा : मोबाईल’च ठरतोय कौटुंबिक नात्यांचा किलर | पुढारी

सातारा : मोबाईल'च ठरतोय कौटुंबिक नात्यांचा किलर

सातारा : विठ्ठल हेंद्रे :  मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे बहतेक नात्यांमध्ये संवादाची झालर कमी झाली असून पती-पत्नीच्या नात्यांमध्ये तर तो किलरच ठरत आहे. अनेकदा एक्स किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्ससाठी मेसेज, चॅटींग, व्हिडीओ कॉलिंग करताना एकमेकांच्या भानगडी सापडत असल्याने वाद विकोपाला जाऊन घटस्फोटापर्यंत प्रकरणे जात आहेत. दरम्यान, यासाठी सातारा तालुका पोलिस ठाण्यातील महिला समुपदेशन केंद्राकडून नात्यांची विण घट्ट बांधण्यासाठी सकारात्मक प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे.

सध्या सोशल मीडियावरील व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, फेसबुक यासह विविध माध्यमे एकमेकांच्या संपर्कासाठी उपलब्ध आहेत. प्रामुख्याने अनेक सोशल मीडियावर अकाऊंट काढण्याची जणू क्रेझच झाली आहे. शाळकरी मुलांपासून वयाच्या पन्नाशीपर्यंत असणारे सर्वच स्तरातील व्यक्ती सोशल मिडीया वापरत आहेत. आभासी दुनियेत बहुतेक मंडळी रमलेली असून याचाच गैरफायदा सायबर चोरटे घेत आहेत.

दुसरीकडे मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे अनेकांच्या संसाराला दृष्ट लागत असून त्याची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
पोलिस ठाण्यांमध्ये पती- पत्नीच्या वादाचे प्रकार आल्यानंतर पोलिस जिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत महिला समूपदेशन केंद्र, राधिका रोड येथे पाठवत आहेत. याठिकाणी समुपदेशक ज्योती जाधव, आरती रजपूत या आलेल्या तक्रारदारांचे ऐकून घेवून पती-पत्नीला समजावून सांगत आहेत.

आई-सासू मंडळींची लुडबूड अन् पुरुषांच्याही तक्रारी…

कौटुंबिक कलहामध्ये आजही आई-सासू मंडळींची लुडबूड अधिक असल्याचे अनेक तक्रारींवरुन समोर येत आहे. या दोघींच्यामध्ये बिचाऱ्या पुरुष मंडळींचे हाल होत आहेत. दरम्यान, महिलांच्या तक्रारी बरोबरच पुरुष तक्रारदारांचीही संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पत्नी नाहक त्रास देते. तिला तिच्या आई, बहिणींची अधिक फूस असते, अशा तक्रारी असल्याचे पुरुष तक्रारदारांचे म्हणणे आहे.

तक्रार कोणाचीही असो, त्यांनी समोर आले पाहिजे. अनेकदा कौटुंबिक पातळीवर वाद कमी होण्याऐवजी वाढण्याचीही भिती आहे. यामुळे महिला असो वा पुरुष त्यांनी आमच्याकडे तक्रारी मांडाव्यात. तक्रार आल्यानंतर दोघांना स्वतंत्र बोलवले जाते. यातून दोन्ही बाजू समोर येतात. अंतिमवेळी दोघांना समोर बसवून दोघांच्या कोणत्या चुका होत आहेत व त्या कशा सुधाराव्यात हे सांगितले जाते.

– ज्योती जाधव, समुपदेशक

Back to top button