पुणे : सनई-चौघड्याच्या सुरात विदेशी पाहुण्यांचे हेरिटेज वॉक | पुढारी

पुणे : सनई-चौघड्याच्या सुरात विदेशी पाहुण्यांचे हेरिटेज वॉक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बुधवारी पहाटे साडेसहाची वेळ… पर्यटकांनी भरलेली बस… त्यासमोर पोलिसांचा सायरन वाजवत आलेला वाहनांचा ताफा पाहून कडाक्याच्या थंडीत चहाचा घोट घेत हातातील कप खाली ठेवून पुणेकर खिडकीतून डोकावले. पुणेकरांचे कुतूहलाने डोकावून पाहणे विदेशी पाहुण्यांना आवडले आणि त्यांनी चक्क दोन्ही हात जोडून ‘नमस्ते पुणे’ अशी साद दिली. पुणेकरांनी देखील हातातील कप उंचावत चहाचे आमंत्रण देत पाहुण्यांचे स्वागत केले.

बुधवारी सकाळी विदेशी पाहुण्यांनी पुणे सोडण्याआधी हेरिटेज वॉक केला. हा संपूर्ण परिसर रांगोळ्या व रेड कार्पेटने सजविला होता. बसमधून उतरताच मराठमोळ्या शैलीत सनई-चौघड्याच्या सुरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता पाहुण्यांचे पथक शनिवारवाड्यात दाखल झाले. शनिवारवाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी मोबाईलमध्ये कैद केला.

येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने मार्गदर्शकांना प्रश्नही विचारले. परिसरातील जुने वडाचे झाड पाहण्यासाठी आवर्जून काही क्षण त्यांनी त्या ठिकाणी घालविले. नोंदवहीमध्ये शनिवारवाडा अत्यंत सुंदर, भव्य आणि आकर्षक असल्याची प्रतिक्रिया नोंदविल्या. यानंतर पाहुणे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गेले. तेथे संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. पाहुण्यांनी मनोभावे बाप्पाची आरती करीत पूजा केली.

लालमहाल पाहून भारावले
आरतीनंतर पाहुण्यांचे पथक लालमहालात दाखल झाले. लालमहाल येथे पारंपरिक चौघड्याच्या सुरावटीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर अभिवादन केले. भेटीच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नानावाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला.

अजित आपटे आणि संदीप गोडबोले यांनी पाहुण्यांना पुण्याचा इतिहास आणि वारसास्थळांबाबत माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाहुण्यांचे आभार मानले. या वेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, पर्यटन विभागाच्या सहायक संचालिका सुप्रिया करमरकर, वारसास्थळ जतन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी आदी उपस्थित होते.

आगाखान पॅलेसला भेट
पाहुण्यांनी महात्मा गांधी वास्तव्यास असलेल्या आगाखान पॅलेसला भेट देऊन त्यांच्या जीवनाविषयी माहिती समजून घेतली. गांधीजींचे बालपण, कस्तुरबा गांधींचे जीवन, आगाखान पॅलेस येथील गांधीजींचे वास्तव्य, याबाबत माहिती विचारली. नीलम महाजन यांनी त्यांना याबाबत तसेच पॅलेसच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती दिली. गांधीजींनी चरखा चालवून स्वदेशी चळवळ कशी देशभर राबवली, याची माहिती जाणून घेतली.

Back to top button