पुणे : भरधाव कारच्या धडकेत एक ठार; एक गंभीर | पुढारी

पुणे : भरधाव कारच्या धडकेत एक ठार; एक गंभीर

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  रस्त्याच्या कडेला गप्पा मारत थांबलेल्या दोघांना भरधाव मोटारीची जोराची ठोस बसल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. तसेच, या अपघातात भरधाव कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीस ठोस बसल्याने तिचे नुकसान झाले. याप्रकरणी फरारी मोटारचालकावर सोमवारी (दि. 16) गुन्हा दाखल करण्यात आला. वासुली फाटा ते आंबेठाण रोड यादरम्यान वराळे (ता. खेड) गावच्या हद्दीत रविवारी (दि. 15) रात्री पावणेआठच्या दरम्यान हा अपघात झाला.

निवृत्ती संतोष बांगर (वय 29, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) असे या अपघातात जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिद्धार्थ अश्रुबा कोरडे (वय 53, रा. वाघजाईनगर, खराबवाडी, ता. खेड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. नितीन रामकृष्ण चिंचोळे (वय 31, रा. महाळुंगे इंगळे) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे पोलिस चौकीत फिर्याद दिली. नितीन यांच्या दुचाकीचेही या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. नितीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाळुंगे पोलिसांनी कारचालक राहुल दिलीप कुबडे (रा. कुरकुंडी, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महाळुंगे पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Back to top button