पुणे : …रिकामे होऊ शकते आपले बँक खाते…! फेक कॉल, संशयास्पद लिंकला प्रतिसाद न देण्याचे आवाहन | पुढारी

पुणे : ...रिकामे होऊ शकते आपले बँक खाते...! फेक कॉल, संशयास्पद लिंकला प्रतिसाद न देण्याचे आवाहन

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : अनेकदा मोबाईलधारकांना खोटे संदेश, विविध लिंक आणि फोन येत असतात. त्याला प्रत्युत्तर करून आपले केवायसीबद्दल माहिती देत ओटीपी सांगितला तर आपले बँक खाते क्षणार्धात खाली होऊ शकते. त्यामुळे बँक ग्राहकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.  रविवारच्या सुटीच्या दिवशी काही ग्राहकांना महाराष्ट्र बँकेतून बोलतोय अशा प्रकारचे कॉल आले असून, विविध प्रश्नांबाबतीत विचारणा करत माहिती मागवण्यात येत होती. यामध्ये समोरील व्यक्ती हिंदी भाषेतून बोलत मी महाराष्ट्र बँकेतून बोलतोय, आपल्या खात्याची केवायसी करण्यासाठी आम्हास आपले आधार क्रमांक, पॅन क्रमांक याची माहिती हवी आहे. तसेच आपल्या खात्यास आधार लिंक नाही. आपला मोबाईल नंबर खात्यास दिसत नाही.

आपल्या मोबाईलवर येणारा ओटीपी पासवर्ड आम्हास सांगावा असे म्हणत होती. अशा प्रकारे बनावट फोन आल्याने अनेक ग्राहकांचा गोंधळ उडाला. अनेकांना सदर बाब संशयास्पद वाटल्याने त्यांनी सावधानता बाळगली. पण, ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांना संबंधित कॉल, लिंक, मेसेजेस खोटे अथवा बनावट आहे हे कळेलच असे नाही. तसेच या बाबतीत विचारणा करण्यासाठी बँक केव्हाही आपल्या ग्राहकांना संपर्क करत नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांनी या बनावट कॉलला कोणताही प्रतिसाद न देता थेट आपल्या नजीकच्या शाखेत जाऊन संपर्क साधणे गरजेचे आहे.

अशा प्रकारच्या फोनला कोणताही प्रतिसाद देऊ नये व खात्यासंबंधी गोपनीय बाबी फोनवर कोणास सांगू नये, अशा प्रकारचे संदेश देत बँका आपणास वारंवार सूचित करत असतात. यामुळे ग्राहकांनी सतर्कता बाळगून आपल्या बँक खात्याची काळजी घ्यावी. तसेच आपल्या नजीकच्या बँक शाखेस जाऊन भेट देत समक्ष माहिती घ्यावी. अन्यथा बँक खाते रिकामे होऊन ग्राहकांचे मोठे नुकसान होऊ शकते.

Back to top button