सामाजिक संदेशासाठी 2100 कि.मी.ची सायकल यात्रा ; पुण्यातील सायकलस्वारांचा पाच राज्यांतून प्रवास | पुढारी

सामाजिक संदेशासाठी 2100 कि.मी.ची सायकल यात्रा ; पुण्यातील सायकलस्वारांचा पाच राज्यांतून प्रवास

महर्षिनगर : पुढारी वृत्तसेवा :  पुण्यातील आठ सायकलस्वारांनी पुणे ते झारखंड यादरम्यानची 2100 किलोमीटरची सायकल यात्रा 17 दिवसांमध्ये पूर्ण केली आहे. थंडी, हवामानात होणारे बदल, कडाक्याची थंडी यांची पर्वा न करता त्यांनी सामाजिक संदेश देत ही यात्रा पूर्ण केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. या सायकल यात्रेत अंकिता शहा, सुरेश माने, नंदकुमार तांबे, अनेरी शहा, अंकिता शहा, विराज शहा, राहुल शहा, उत्तम धोका हे सहभागी झालेले होते. पुण्यातील सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी येथून सुरू झालेली ही सायकल यात्रा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांतील सोळा शहरे पार करत जैन धर्माचे तीर्थस्थळ असलेल्या शिखरजी (झारखंड) येथे सतरा दिवसांनी पोहोचली.

या यात्रेदरम्यान सायकलस्वारांनी सामाजिक ऐक्य, शांतीचा संदेश दिला. या सायकल प्रवासात सायकलस्वारांनी इंद्रायणी, नर्मदा, यमुना, शरयू आणि गंगा या नद्यांचे दर्शन घेत व पूजन करत जलदेवतेचा संपूर्ण जीवसृष्टीवर कायमस्वरूपी आशीर्वाद राहावा, अशीही प्रार्थना केली. या यात्रेदरम्यान अयोध्या येथे श्रीराम मंदिर, पुरिमतल येथे श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांना वनवासात जाताना आणि येताना ज्या वृक्षाखाली निवास केला होता, त्या अक्षयवटवृक्षाचे दर्शन घेतले. तसेच जैन समाजाचे प्रथम तीर्थंकर श्री आदेश्वरदादा यांचेही दर्शन घेतले. पुढे गंगा आरती करून त्यांनी बिहार राज्यात प्रवेश केला. त्यानंतर झारखंडमध्ये शिखरजी येथे या यात्रेची सांगता करण्यात आली.

दररोज 120 किलोमीटरचा प्रवास
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड ह्या चारही राज्यांत या सायकलस्वारांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. दररोज किमान 120 ते 130 किलोमीटर अंतर पार करत सर्व राज्यांमध्ये स्थानिक लोक, पोलिसांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या सायकल यात्रेचे नाव नलिनीगुल्म अर्थात देवविमान, असे ठेवण्यात आले होते.

Back to top button