चाकण : चाकणमधील आणखी एका टोळीवर मोक्का | पुढारी

चाकण : चाकणमधील आणखी एका टोळीवर मोक्का

चाकण; पुढारी वृत्तसेवा : चाकण पोलिसांनी पाच गुन्हेगारी टोळ्यांविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याचे प्रस्ताव पाठवल्याची बाब समोर आली आहे. चाकण पोलिसांनी मोक्का कारवाईसाठी पाठवलेल्या तिसर्‍या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. चाकणमधील शुभम म्हस्के व 15 जणांच्या टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे सादर केला होता. कागदपत्रांची पडताळणी करून या प्रस्तावास पोलिस आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

चाकणच्या औद्योगिक भागातील गुन्हेगारीचा आलेख नेहमीच चढ-उताराचा राहिला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत माजविणे, खंडणी, लूटमार आणि सावकारीच्या माध्यमातून गुन्हेगारी नेहमीच फोफावत राहिली. चाकणमध्ये अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल होऊनही गुन्हेगारांना कायद्याची कोणतीच भीती राहिली नसल्यासारखी स्थिती मागील काही काळात पाहावयास मिळत होती. त्यातच संघटित गुन्हेगारीने डोके वर काढल्यानंतर चाकण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याचे हत्यार उपसल्याने या गुन्हेगारांना पळता भुई थोडी झाली आहे.

चाकण पोलिसांनी शिंदे, कड, परदेशी, दौंडकर, म्हस्के अशा तब्बल पाच टोळ्यांवर मोक्का कारवाईचे प्रस्ताव सादर केले असून त्यातील संदीप शिंदे व सत्यम कड यांच्या टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. आता शुभम म्हस्के याच्यासह 15 जणांच्या टोळीवर मोक्का प्रस्तावास पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाने मंजुरी दिली आहे. चाकण पोलिसांच्या रडारवर असलेले काही नामचीन गुन्हेगार गेल्या काही महिन्यांपासून भूमिगत झाले आहेत. त्यामुळे मफमोक्काफफ गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

चाकणमध्ये मोक्का कारवाई झालेल्या सर्व गुंडांवर चाकण आणि परिसरातील पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खुनाच्या बदल्यासाठी खून हे नव्याने सुरू झालेले सत्र थोपविण्यासाठी चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार गुन्हेगारी टोळ्यांभोवती फास आवळले आहेत. मोक्का कारवाईतून संघटित गुन्हेगारी करणारे गुन्हेगार सुटूच शकत नसल्याची स्थिती आहे.

दरम्यान, तडीपारी आणि मोक्का अशा कारवायांना पात्र ज्यांची ओळख असणारे अनेकजण राजकारण, ठेकेदारी व जमीन व्यवहारांमध्ये सक्रिय आहेत. राजकीय पक्षांच्या आश्रयाला गेलेल्या राजकारणातील गुन्हेगारांना गचांडून बाहेर काढण्याची हिम्मत संबंधित राजकीय पक्षांनी दाखविण्याची गरज असल्याची नागरिकांची भावना आहे.

 

Back to top button