नगर : 68 लाख लिटरची जुनी टाकी कार्यान्वित होणार; महापौरांनी घेतली आढावा बैठक | पुढारी

नगर : 68 लाख लिटरची जुनी टाकी कार्यान्वित होणार; महापौरांनी घेतली आढावा बैठक

नगर; पुढारी वृत्तसेवा : वसंत टेकडी येथील 68 लाख लिटरची जुनी पाण्याची टाकी दुरुस्तीसाठी घेण्यात आली होती. दुरुस्तीचे काम येत्या दोन दिवसांपूर्ण होऊन टाकी मनपाच्या ताब्यात मिळणार आहे. त्यानंतर येत्या पाच दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी आढावा बैठकीत दिली. शहरात केडगाव, कल्याण रोड, मुख्य शहर, पाईपलाईन रोड परिसरात पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडला होता. त्या पार्श्वभूमीवर महापौर रोहिणीताई शेंगडे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला आयुक्त डॉ. पंकज जावळे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, जलअभियंता परिमल निकम, उपअभियंता रोहिदास सातपुते आदी उपस्थित होते.

यावेळी शहरातील अनेक भागात वेळेला पाणीपुरवठा होत नाही. पाणी आलेच तर अत्यंत कमी दाबाने येते. त्यामुळे अनेक भागात पाणी मिळत नाही. कल्याण रोड परिसरात अगोदरच टँकर सुरू आहेत. त्यात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने टँकर ओढा-ओढा सुरू झाली.
दरम्यान, वसंत टेकडी येथील पाण्याची जुनी टाकी दुरूस्तीसाठी ठेकेदाराच्या ताब्यात देण्यात आली आहे.

ती टाकी लवकरात लवकर दुरूस्त झाल्यास पाणीपुरवठा सुरळीत होईल. त्यामुळे ती टाकी तत्काळ दुरूस्त करून ताब्यात घ्या, अशी मागणी महापौरांसह उपस्थितांनी केली. त्यावर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले, की येत्या दोन ते तीन दिवसांत 68 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी दुरूस्त होऊन मनपाच्या ताब्यात मिळणार आहे. त्यानंतर तत्काळ चाचणी घेऊन त्या टाकीद्वारे शहरात पाणीपुरवठा वितरित करण्यात येईल.

पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार
जुन्या टाकीचे आऊटलेट थेट बेसमेंटला असल्याने शेवटपर्यंत पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होतो. नवीन टाकीचे आऊटलेट एक मीटर उंचीवर असल्याने पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. त्याचा परिणाम वितरण व्यवस्थेवरही होतो. जुन्या टाकीतून पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे

Back to top button