बारामती-फलटण रस्त्यावरील खड्डे बुजवले; अजितदादा पवार यांच्या सूचनेची अंमलबजावणी | पुढारी

बारामती-फलटण रस्त्यावरील खड्डे बुजवले; अजितदादा पवार यांच्या सूचनेची अंमलबजावणी

सांगवी; पुढारी वृत्तसेवा : बारामती- फलटण रस्त्याचे काम गेल्या बारा वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यावर मोठमोठ्या खड्डे पडले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार संबंधितांनी दखल घेऊन अखेर या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची अंमलबजावणी सुरू केली. दरम्यान, या खड्ड्यांबाबत दैनिक ‘पुढारी’ने वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

मागील आठवड्यात शनिवारी (दि. 7) अजित पवार हे सायंकाळी कोल्हापूरकडे जाताना सांगवी येथे माळेगाव कारखान्याचे संचालक अनिल तावरे यांच्या निवासस्थानी थांबले होते. त्या वेळी बारामती बँकेचे अध्यक्ष सचिनशेठ सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दूध संघाचे संचालक प्रकाशराव तावरे आदी उपस्थित होते.

सांगवीकडे येत असताना त्यांना या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा अनुभव आला. पवार यांनी संबंधितांकडून रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत माहिती घेतली. तसेच खांडज पाटी, 22 फाटा, शिरवली चौफुला, जरांडे वस्ती, सांगवी या ठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने रविवारी (दि. 15) खड्डे बुजविण्यात आले.

या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. तसेच अनेक वाहनचालकांना कायमचे अपंगत्व आले. याबाबत दैनिक ‘पुढारी’च्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. अखेर या रस्त्याच्या खड्ड्यांचा प्रश्न काहीअंशी कमी झाल्याने सर्वच स्तरांतून दैनिक ‘पुढारी’चे कौतुक केले जात आहे.

Back to top button