पुणे : प्राणिसंग्रहालयाचे तिकीट लवकरच ऑनलाइन | पुढारी

पुणे : प्राणिसंग्रहालयाचे तिकीट लवकरच ऑनलाइन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या ऑनलाइन तिकीट यंत्रणेसाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर पुणे महापालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून नुकतेच तयार झाले असून, आता आवश्यक त्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची खरेदी आणि प्रत्यक्ष चाचणी झाल्यावर पुणेकरांना महिनाभरातच प्राणिसंग्रहालयाचे घरबसल्या ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे.
विकेंडला आणि सणासुदीला मिळालेल्या सुट्यांच्या दिवशी कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते.

पर्यटकांना तिकीट घेण्यासाठी तीन ते चार तास रांगेतच उभे राहावे लागते. यावेळी अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे ही महत्त्वाचे होते. त्या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून ऑनलाइन तिकीट यंत्रणा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याचे काम आता पूर्ण झाले असून, लवकरच पर्यटकांना घरबसल्या चित्रपटगृहाच्या तिकिटांप्रमाणे हे तिकीट ऑनलाइन काढता येणार आहे. या प्रणालीकरिता प्राणिसंग्रहालय प्रशासनाला सुमारे 15 लाख रुपयांपर्यत खर्च आला असून, त्याचे काम पुणे महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून करण्यात आले आहे.

ग्रुपसाठीही ऑनलाइन तिकीट शक्य…
या प्रणालीद्वारे शाळा, विविध संस्था किंवा पर्यटकांना ग्रुपसाठी तिकीटसुद्धा ऑनलाइन बुक करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. तसेच, ऑनलाइनरित्या प्राणिसंग्रहालयाच्या काही परवानग्यादेखील मिळणार आहेत. यात फोटो काढण्यासाठीची परवानगी, प्राणिसंग्रहालयावर अभ्यास करण्यासाठी असलेल्या परवानगीचा समावेश आहे. यासोबतच पर्यटकांना या प्रणालीवर राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाची इत्यंभूत माहितीसुध्दा मिळणार आहे.

असे करा ऑनलाइन पेमेंट…
चित्रपटाचे तिकीट आता ज्याप्रमाणे घरबसल्या ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध आहे त्याप्रमाणेच तुम्हाला राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे तिकीट घरातूनच मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून काढता येणार आहे. तिकीट बुक झाल्यावर तुम्हाला एक क्युआर कोड मिळेल. हा क्युआर कोड प्रवेशद्वारावर असलेल्या स्कॅनर मशिनवर स्कॅन केल्यावर प्राणिसंग्रहालयात तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. यामुळे पर्यटकांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही.

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पुण्यासह राज्यभरातून अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी होत असते. पर्यटकांना बराचवेळ रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे ऑनलाइन तिकीट यंत्रणा सुरू करण्याचे नियोजन होते. त्यानुसार महिनाभरातच ही सेवा पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे.
                                                                          -अशोक घोरपडे,
                                                           मुख्य उद्यान अधीक्षक, पुणे मनपा

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील ऑनलाइन तिकीट यंत्रणेकरिता आम्ही सॉफ्टवेअर तयार केले आहे. ते नुकतेच पूर्ण झाले असून, आता संगणक, प्रिंटर आणि स्कॅनर मशिन खरेदी केल्यावर लगेचच ही सेवा सुरू करण्यात येईल.
                                                                        -राहुल जगताप,
                                                माहिती व तंत्रज्ञान विभागप्रमुख, पुणे मनपा

Back to top button