शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदे मिळणे शक्य; अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार? | पुढारी

शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदे मिळणे शक्य; अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार?

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता असून, त्यात महाराष्ट्रातून शिंदे गटाला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. या गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद, तर दुसरे राज्यमंत्रिपद दिले जाणार, असे बोलले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात दोन बैठका झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळासह राज्य तसेच भाजपच्या केंद्रीय संघटनात्मक रचनेतही महत्त्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विस्तृत मंथन होत असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत भेटी घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच संघटन महासचिव बी. एल. संतोष उपस्थित होते. त्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि पक्ष संघटनेत बदल, या दोन विषयांवर विचारमंथन झाले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीचा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार राहणार असून, विस्ताराच्या माध्यमातून राज्यांच्या समीकरणाच्या अनुषंगाने मोठे बदल केले जातील. या माध्यमातून राज्यातील राजकारण, सामाजिक समीकरण साधले जाईल. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवर विचारमंथनाची प्रक्रिया सुरू होईल, असे बोलले जात आहे. काहींना बढती मिळणार बिहारमध्ये राजकीय समीकरणासाठी चिराग पासवान तसेच नितीशकुमार यांचे निकटवर्तीय राहिलेले आर. सी. पी. सिंह यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात अगोदरपासून सहभागी असलेल्या मित्रपक्षांच्या मंत्र्यांना बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षातही मोठे बदल अपेक्षित भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ एक वर्षांने वाढवण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यात संघटनात्मक बदल, आवश्यक नेतृत्व परिवर्तन तसेच केंद्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण संघटनात्मक बदल केले जातील. १५ फेब्रुवारीपर्यंत हे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रपक्षांना स्थान मिळणार मंत्रिमंडळ विस्तारात यंदा मित्रपक्षांना विशेष स्थान दिले जाईल. जनता दल (युनायटेड), अकाली दलाने ‘एनडीए’ सोडल्यानंतर तसेच शिवसेना दुभंगल्यानंतर मोदी सरकार तसेच भाजप मित्रपक्षविरोधी विचारांचे असल्याचा आरोप करण्यात आले होते. अशात विस्तारात मित्रपक्षांना प्राथमिकता दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातून कोण ? एकच उत्सुकता ! महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट भाजपसोबत आला आहे. त्यामुळे शिंदे गटाला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. आता विस्ताराचे वारे वाहू लागल्यानंतर कोणाला मंत्रिपद मिळेल, याची उत्सुकता आहे. सध्या शिंदे गटाचे १२ खासदार लोकसभेत आहेत.

Back to top button