कोल्हापूर : मत्स्यबीजनिर्मिती ठप्प | पुढारी

कोल्हापूर : मत्स्यबीजनिर्मिती ठप्प

कोल्हापूर, गौरव डोंगरे : पंचगंगा नदीत प्रदूषणामुळे होत असलेला माशांचा मृत्यू… तलावांचे अडकलेले ठेके… मत्सबीजांच्या खरेदीसाठी कर्नाटक, आंध्रकडे मच्छीमारांची धावपळ अन् बंद पडलेली मत्स्यबीज केंद्रे अशा गर्तेत सध्या जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय अडकला आहे.

जिल्ह्यात दोन मत्स्यबीज उत्पादन केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी एक म्हणजे रंकाळा तलावाशेजारील, तर दुसरे तिलारी येथे 25 हेक्टर जागेवर बनविण्यात आलेले मत्स्यबीज केंद्र.

मत्स्यबीजांच्या निर्मितीसाठी रंकाळा मत्स्यबीज केंद्र अत्यंत पोषक मानले जात होते. मात्र, 2019 व 2021 मध्ये अतिवृष्टीनंतर रंकाळा तलावाचे पाणी ओव्हर फ्लो झाल्याने येथील मत्स्यबीज केंद्राला अवकळा आली आहे. अपुरे मनुष्यबळ, पाण्याची पातळी कमी होणे, कचर्‍याचे साम्राज्य अशामुळे सध्या येथील मत्स्यबीजनिर्मिती थांबली आहे.

काही तांत्रिक कारणांनी रंकाळा व तिलारीतील मत्स्यबीज निर्मिती थांबली आहे. परंतु, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचे मत्स्य व्यवसाय साहाय्यक आयुक्त ए. व्ही. भादोले यांनी सांगितले.

मत्स्यबीजाला मागणी

जिल्ह्यात मासेमारी करणार्‍या संस्थांना तलावामध्ये मत्स्यबीज सोडावे लागते. यातून जिल्ह्यात वर्षाकाठी कोट्यवधींची उलाढाल होत असते. जिल्ह्यात प्रतिवर्षी 80 लाख ते 1 कोटी मत्स्यबीजाची आवश्यकता भासते. परंतु, मत्स्यबीज निर्मितीच ठप्प असल्याने मच्छीमारांना बाहेरील राज्यातून मत्स्यबीज आणावे लागत आहे.

Back to top button