अंगारकी संकष्‍टी चतुर्थी २०२३ : जाणून घ्या पूजा, श्रद्धा, महत्‍व आणि चंद्रोदयाची वेळ | पुढारी

अंगारकी संकष्‍टी चतुर्थी २०२३ : जाणून घ्या पूजा, श्रद्धा, महत्‍व आणि चंद्रोदयाची वेळ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क ; अंगारकी संकष्‍टी चतुर्थी या दिवसाला गणेश भक्‍तांमध्ये महत्‍वाचे स्‍थान आहे. अंगारकी संकष्‍टीला संकटे दूर करणारी चतुर्थीही मानले जाते. या दिवशी मनोभावे अंगारकी संकष्‍टीचे व्रत करणाऱ्या भक्‍तांना श्री गणेश प्रसन्न होतात आणि त्‍यांची सर्व संकटे दूर करून त्‍यांना शुभ आशिर्वाद देतात अशी भाविकांमध्ये धारणा आहे.

अंगारकी संकष्‍टीला दक्षिण भारतातील राज्‍यांमध्ये संकटहर म्‍हणजेच संकटे दूर करणारी चतुर्थी नावानेही ओळखले जाते. श्री गणपती बाप्पांच्या पूजनासाठी हा शुभ दिवस मानला जातो. मंगळवारी येणाऱ्या अंगारकी संकष्‍टीला वर्षातील प्रत्‍येक महिण्यात येणाऱ्या संकष्‍टीपेक्षा अधिक शुभ मानले जाते. महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक घरात अंगारकी संकष्‍टीचे व्रत मोठ्या भक्‍तीभावाने केले जाते.

अंगारकी संकष्‍टी दिवशी भाविक सकाळी लवकर उठून स्‍नानादी आटोपल्‍यावर श्री गणेशाची पूजा करून प्रार्थना करतात. या दिवशी भाविकांकडून उपवास केला जातो. सकाळी सुर्योदयापासून रात्री चंद्रोदयापर्यंत हा उपवास केला जातो.

श्री गणेशाच्या मूर्तीला दुग्‍धाभीषेक घालून गरम पाण्याने जलाभिषेक घातला जातो. यानंतर कापसाचे वस्‍त्र, गणरायाला प्रिय असणाऱ्या २१ दुर्वांची जुडी, लाल जास्‍वंदीची फुले अर्पण केली जातात. यानंतर चद्रोदयानंतर श्री गणेशाची आरती करून उकडीच्या २१ मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण केला जातो. तो प्रसाद सर्वांना वाटला जातो. यानंतर भाविक गणेशाचा प्रसाद ग्रहण करून संकष्‍टीचा उपवास सोडत असतात.

अंगारकी संकष्‍टी चतुर्थीचे महत्‍व

या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्‍याने आपल्‍या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात समृध्दी येते अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे.

चंद्रोदय वेळ :

आज वर्षाच्या सुरूवातीलाच म्‍हणजेच जानेवारी महिण्याच्या १० तारखेला अंगारकी संकष्‍टी आहे. रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी चंद्रोदय आहे.

संकटे दूर करणारी चतुर्थी म्‍हणून या संकष्‍टीला भाविकांमध्ये महत्‍वाचे स्‍थान आहे. महिला आपल्‍या मुलांच्या दिर्घायुष्‍यासाठी आणि समृद्धीसाठी या दिवशी व्रत करतात.

हेही वाचा : 

 

Back to top button