पिंपरी : संक्रांतीसाठी बाजारपेठेत धूम | पुढारी

पिंपरी : संक्रांतीसाठी बाजारपेठेत धूम

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रांतीच्या सणासाठी बाजारपेठेत सध्या खरेदीची ‘धूम’ पाहण्यास मिळत आहे. महिला वर्गाकडून हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी आवश्यक वाण साहित्याची खरेदी करण्यात येत आहे. त्यामध्ये वाण ओवसा करण्यासाठी लागणारे सुगड, तीळ, तीळगूळ, रेवडी, गजक, गूळपापडी आदींच्या मागणीत वाढ झाली आहे. यंदा 15 जानेवारीला मकरसंक्रांत आहे. संक्रांतीनिमित्त घरोघरी हळदी-कुंकूचे कार्यक्रम होतात.

महिलांकडून एकमेकींना वाण देण्याची पद्धत आहे. यामध्ये वाण ओवसासाठी लागणारे सुगड खरेदीसाठी तसेच हळदी-कुंकवाचे करंडे, कंगवा, आरसा, बांगड्या, शुभलाभचे वॉलपीस, लक्ष्मीची पाऊले, कापडी फुलांचे गजरे, नथ, आंब्याच्या पानांची कागदी तोरणं, हलव्याचे दागिने त्याचप्रमाणे, कमी किंमतीची भांडी अशा विविध वाण साहित्याची खरेदी करण्यासाठी पिंपरी बाजारपेठेत महिलांची गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे, खास सणासाठी विविध साड्यांचीदेखील महिलांकडून खरेदी करण्यात येत आहे.

गूळपापडी, रेवडी, गजकला मागणी :
पूर्वी साखरेतील तीळपापडी, रेवडी आणि गजक यांना मागणी होती. मात्र, सध्या गुळातील रेवडी, तीळपापडी आणि रेवडी यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार आता गुळामध्ये हे पदार्थ बनविले जात आहेत. त्याची खरेदी सध्या सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाच्या पदार्थांच्या प्रतिकिलोच्या दरात 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती विक्रेते अविनाश आथवानी यांनी दिली.

साहित्य : दर (प्रतिकिलो)
तीळगूळ 45 ते 50, सफेद तीळ 205 ते 210, रेवडी 120, गजक

पतंगांचीही खरेदी सुरू
मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याची पद्धत आहे. संक्रांतीचा सण अवघ्या पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपला असल्याने पतंगांची खरेदी सुरु झाली आहे. तसेच, आत्तापासूनच पतंग उडवताना बालगोपाळ दिसत आहेत. पिंपरी बाजारपेठेत विविध आकर्षक रंगसंगतीतील आणि डिझाईनमधील पतंग विक्रीसाठी आले आहेत.

Back to top button