कांझवाला ‘हिट अँड रन’ प्रकरण मोठा खुलासा: … तरीही आरोपींनी कार घटनास्‍थळावरुन पळवली | पुढारी

कांझवाला 'हिट अँड रन' प्रकरण मोठा खुलासा: ... तरीही आरोपींनी कार घटनास्‍थळावरुन पळवली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीसह देशाला हादरवून सोडणार्‍या कांझवाला ‘हिट अँड रन’ प्रकरणी आज ( दि. ८) आरोपींनी मोठा खुलासा केला आहे. धडक दिल्‍यानंतर तरुणी कारखाली सापडल्‍याचे माहित असूनही कार घटनास्‍थळावरुन सुसाट पळविल्‍याची कबुली त्‍यांनी दिली आहे. कार खाली सापडलेल्‍या तरुणीचामृ तदेह बाहेर काढला असता तर खुनाचा गुन्‍हा दाखल होण्‍याची भीती होती. त्‍यामुळेच कारखाली तरुणी चिरडली गेल्‍याचे माहित असूनही सुसाट वेगाने कार घटनास्‍थळावरुन पुढे नेल्‍याची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

खुनाचा गुन्‍हा दाखल होण्‍याच्‍या भीतीने कार पळवली

आरोपीने पोलिसांना दिलेल्‍या जबाबत म्‍हटले आहे की, अपघातानंतर कारचालकासह कारमधील सर्व तरुण घाबरले. त्‍यांना कार सुसाट वेगाने पुढे नेत घटनास्‍थळावरुन पुढे नेली. यावेळी तरुणी कारखाली अडकली असल्‍याचे आरोपींना माहित होते. यापूर्वी आरोपींनी कारमध्‍ये मोठ्या आवाजात टेप लावल्‍यामुळे तरुणी कार खाली अडकल्‍याची माहिती नव्‍हती, असा दावा केला होता. मात्र नव्‍या खुलाशामुळे आता या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा, मिथुन, मनोज मित्तल, आशुतोष आणि अंकुश या आरोपींना अटक केली होती. यातील सहा जण सध्‍या पोलिस कोठडीत आहेत.

या प्रकरणातील सातवा आरोपी अंकुशला शनिवारी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्याला २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. शुक्रवारी ( दि. ६) त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.

३१ डिसेंबरच्या रात्री अंजली तिची मैत्रीण निधीसोबत दुचाकीववरून घरी जात होती. कांजवाला रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिली. निधी बाजुला फेकली गेल्‍याने बाचावली. तिला किरकोळ दुखापत झाली. तर अंजली कारखाली अडकली. कारमध्ये बसलेल्या तरुणांनी अंजलीला सुमारे १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. याप्रकरणी पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली होती.

अमित शहांनी मागवला तपास अहवाल

कांझवाला ‘हिट अँड रन’ प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी त्‍यांनी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी शालिनी सिंह यांना अहवाल तयार करण्याचे आदेश त्‍यांनी दिल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : 

 

Back to top button