पीपल्स रिपब्लिकन पक्ष- शिंदे गटाच्या युतीची घोषणा | पुढारी

पीपल्स रिपब्लिकन पक्ष- शिंदे गटाच्या युतीची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची युती करण्यात येत असल्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी आज (दि. ४) संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

कवाडे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या रूपात महाराष्ट्राला धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे. सर्वसामान्यामध्ये मिसळणारा मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यामुळे विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी आमच्या निवेदनाची साधी दखलही घेतली नव्हती, असा आरोप यावेळी कवाडे यांनी केला.

दरम्यान, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा बाहेर येताच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये युतीबाबत दीर्घ चर्चा झाली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बोलले जात होते.

माध्यमांशी संवाद साधताना जोगेंद्र कवाडे म्हणाले होते की, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा अजेंडा व आमच्या पक्षाची भूमिकाही एकनाथ शिंदेंना सांगितली. त्यावर साधकबाधक चर्चा झाली. त्याला शिंदे यांनी चांगला प्रतिसाद दिला. या चर्चेनुसार आगामी निवडणुकीतील शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र लढणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कवाडे गट, दलित पँथर इतर आंबेडकरी चळवळींना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे. ज्या काँग्रेससोबत आम्ही आघाडी केली, त्यांनी दगाबाजी केल्याचा आरोप कवाडे यांनी यापूर्वीच केला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button