

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना जितक्या जागा सोडेल त्या लढण्याची आमची तयारी आहे, अशा शब्दांत शिवसेनेसोबत आघाडी करण्याचे संकेत 'वंचित'चे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
वंचितच्या प्रदेश कार्यालयात मंगळवारी पत्रकार परिषदेत अॅड. आंबेडकर म्हणाले, शिवसेना आणि आमच्यात जागा वाटपावरून भांडण नाही. आमचा एकही नेता तपास यंत्रणांच्या रडारवर नाही. त्यामुळे मला वंचित आणि शिवसेना युती स्थिर दिसते. आम्ही मुंबईत ८३ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. पण आम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उघड तर काँग्रेसचा छुपा विरोध आहे. तरीही आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतही जायला तयार आहोत.
मात्र, वंचित बहुजन आघाडीची अडवणूक करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न करतील. गरीब मराठा सत्तेत यावा असे राष्ट्रवादीला वाटत नसावे म्हणून त्यांचा आम्हाला विरोध असावा. असे असले तरी आमचा आणि शिवसेनेचा निर्णय झाला आहे. तो फक्त आम्हाला जाहीर करायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.