महाराष्ट्रात सर्व प्रकारचे शिक्षण मराठीमधून : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

महाराष्ट्रात सर्व प्रकारचे शिक्षण मराठीमधून : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी भाषा टिकवण्यासाठी लोकचळवळीत रूपांतर करणे गरजेचे आहे. मातृभाषेचा गोडवा ओळखण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवीन शैक्षणिक धोरणात त्यांनी उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम राज्यांच्या भाषांमध्ये सुरू करून त्यामधून शिक्षण देण्यासाठी सांगितले आहे. यामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात सर्व प्रकारचे शिक्षण मराठीमधून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या काळात मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचं काम करणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई येथे आज विश्व मराठी संमेलनात ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विश्व मराठी संमेलनाचे आज उद्घाटन झाले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी विश्व संमेलन आयोजित केले आहे. मराठीचा प्रत्येक विभागातील गोडवा वेगळा आहे. प्रत्येक भाषा कलाकलाने बदलत जाते तशी मराठीही बदलत जाते. या भूमीने भारत मातेला स्वाभिमान दिला आहे. परकीय आक्रमणांच्या जाळ्यातून स्वराज्य स्थापन करण्याचं काम मराठी भूमीने केले आहे. मराठी ही केवळ भाषा नाही हा एक विचार आहे, अभिव्यक्ती आहे. जो विचार विश्वकल्याणाचा देखील आहे. विश्वाला दिशा देणारा सुद्धा आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक, आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्य लढ्याबरोबरच समाज परिवर्तनामध्ये योगदान होते. तसेच त्यांचे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठीही योगदान होते. सावरकरांनी हजारो शब्द मराठीला दिले. महापौर हा शब्द भारतात वापरला जातो. हा शब्द भारताला आणि मराठीला देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते.

पुढच्या पिढीला अभिव्यक्तीचसाधन म्हणून मातृभाषा दिली नाही तर मराठी टिकणार नाही. भाषेतील साहित्य पुढील पिढीकडे गेले नाही तर टिकणार नाहीत. मराठी भाषा टिकवण्यासाठी लोकचळवळीमध्ये रूपांतर करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button