मुंबईतील मराठी टक्का घसरू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) | पुढारी

मुंबईतील मराठी टक्का घसरू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील मराठी माणसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. ती भूमिका राज्यातील सरकारने कायम ठेवली आहे. मराठी माणूस मुंबईतून बाहेर जाता कामा नये. त्यांना ताकद देण्यासाठी प्रसंगी नियम, कायद्यामध्ये बदल करण्यास सरकार तयार आहे. पण मुंबईतील मराठी टक्का घसरू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी आज (दि. ४) दिली. मुंबईत आयोजित विश्व मराठी संमेलनात ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कमी वेळात विश्व मराठी संमेलनाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल मंत्री केसरकर, मराठी विभागाच्या मनिषा म्हैसकर यांचे कौतुक केले. तसेच सरकार स्थापनेच्या सुरूवातीच्या दिवसात मला केसरकरांचा मोठी मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विश्व मराठी संमेलन कमी जागेत आयोजित केले आहे. परंतु पुढील वर्षी मोठ्या स्टेडीयममध्ये संमेलन आयोजित केले जाईल, असे (CM Eknath Shinde) सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. जी भाषा सर्वांना जोडते, जी भाषा सर्वांना सामावून घेते, जी भाषा जात पात धर्माच्या पलिकडची माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते, हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेत ठासून भरले आहेत. “माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके” असे खुद्द संत ज्ञानेश्वरांनी जिथं सांगून ठेवलंय, तिथं माझ्यासारख्या छोट्या माणसानं काय कौतुक करावं, मराठी भाषेचं? असे शिंदे म्हणाले.

मराठी लेखक, कवींनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे. मराठी भाषा माणुसकी शिकवते, संस्कृती जपते. त्यामुळे भाषा, संस्कृती आमचे वैभव आहे. मराठी विश्व संमेलन पहिल्यांदाच होत आहे. याचा आम्हाला आनंद आहे, परंतु यापुढे ते अधिक भव्य दिव्य स्वरूपात व्हावे, यासाठी प्रयत्न केला जाईल.

मराठी माणूस कर्तृत्वाने यशाची शिखरे गाठत आहे. अनेक क्षेत्रात मराठी माणूस पुढे जात आहे. जगाच्या कानारोपऱ्यात मराठी भाषा कानावर पडते. मराठी माणूस जगभरात आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मराठी मातीचा विचार विश्वाला कवेत घेत आहे, सर्वांना पुढे घेऊन जाण्याची आपली संस्कृती आहे, असे सांगून मराठी माणसांना एकत्र आण्याचा विश्व मराठी संमेलन दुवा असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सीमा भागात मराठी भाषिकांचा महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यांच्या पाठिशी राज्यातील सरकार ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button