आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या | पुढारी

आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
मालेगावात नववर्षात हेल्मेटसक्ती होणार आहे. त्यादृष्टीने येत्या 31 डिसेंबरपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला, त्यानंतर 1 जानेवारीपासून थेट दंडात्मक कारवाई होईल. ही सक्ती सुरक्षिततेसाठी असल्याने त्याचे महत्त्व जाणून वाहनचालकांनी त्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले आहे.

अपघातात एकूण मृत्यूंपैकी 60 टक्के मृत्यू हे दुचाकीस्वारांचे होतात. प्रामुख्याने दुचाकीस्वारांच्या डोक्याला व पर्यायाने मेंदूला आघात होऊन अनेकांच मृत्यू ओढवतो. हेल्मेट न घातल्यामुळे भारतात तासाला सहा मृत्यू होतात. डोक्याला होणारे आघात वाचवल्यास अपघातातील दुचाकीस्वारांचे जीव वाचू शकतात. यामुळेच हेल्मेटसक्तीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. विद्यार्थी हे शिक्षकांचे अनुकरण करत असतात. शिक्षकांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केल्यास भविष्यात विद्यार्थीही त्यांचे अनुकरण करतील, या विचाराने शहरातील प्राध्यापक, शिक्षकांची बैठक घेण्यात येऊन कायदा म्हणून नव्हे, तर आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरा, असा संदेश देण्यात आला. महिला महाविद्यालय, डॉ. बी. व्ही. कॉलेज, आरबीएच विद्यालय, एलव्हीएच, राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल, फार्मसी कॉलेज, दौलती स्कूल आदींसह शाळा ते महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button