18 मुलांच्या मृत्यूच्या जबाबदारीसाठी भारतीय औषध कंपनी रडारवर? | पुढारी

18 मुलांच्या मृत्यूच्या जबाबदारीसाठी भारतीय औषध कंपनी रडारवर?

नवी दिल्ली; विशेष प्रतिनिधी :  जागतिक आरोग्य संघटनेने गँबियामधील 70 लहान मुलांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा ठपका भारतातील औषध कंपनीवर ठेवल्यानंतर आता उझबेकिस्तानमधील 18 मुलांच्या मृत्यूचे नवे प्रकरण रडारवर आले आहे. या मृत्यूंना भारतीय बनावटीचे औषध जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करत उझबेकिस्तान येथील प्रशासनाने या मृत्यूंना भारतीय औषध निर्मात्या कंपनीला जबाबदार धरले असून याविषयी भारत सरकारने मात्र कोणतीही तातडीची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

गँबियामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच 70 लहान मुलांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण जगभरात खळबळ माजली होती. यामध्ये केलेल्या तपासणीत संबंधित मुलांचा मृत्यू हा भारतातील हरियाणा राज्यातील सोनपत येथील मेडेन फार्मा या कंपनीने बनविलेल्या सर्दी-खोकल्याच्या औषधाने झाल्याचा ठपका गँबियन सरकारने ठेवला. पाठोपाठ जागतिक आरोग्य संघटनेने संबंधित औषधामध्ये वापरण्यात आलेले डाय इथेलिन ग्लायकॉल आणि पॉली इथेलिन ग्लायकॉलमुळे या मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. या औषधावर बंदी आणण्याचे जाहीर करण्यात आले. परंतु भारत सरकारने एका विशेष पथकाद्वारे राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये त्याची संपूर्ण तपासणी केल्यानंतर या औषधामध्ये इथेलिन ग्लायकॉल वा त्याचे उपपदार्थ (डेरिव्हेटिव्हज्) यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट करीत मेडेन फार्माला क्लीन चिट दिली होती. त्यापाठोपाठ आता उझबेकिस्तानचे नवे प्रकरण पुढे आले आहे. यामध्ये दिल्लीजवळील नोएडा येथील मॅरियन बायोटेक या कंपनीकडे अंगुलिनिर्देश करण्यात येतो आहे.

उझबेकिस्तान येथील वृत्तवाहिन्या आणि वेबसाईटवर याविषयीच्या बातम्या मोठ्या प्रमाणात झळकत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या कंपनीचे सर्दी-तापावरील ‘डॉक-1 मॅक्स’ हे औषध या लहान मुलांच्या मृत्यूला जबाबदार असण्याचा संशय आहे. ‘डॉक-1 मॅक्स’ या औषधाच्या लिक्विड व गोळ्या स्वरूपामध्ये इथेलिन ग्लायकॉल या मूलद्रव्याचा समावेश आहे. संबंधित मूलद्रव्य हे विषारी मानले जाते. हे रसायन औद्योगिक दर्जाच्या ग्लिसरिनमध्ये सापडते आणि त्याचा औषधामध्ये वापर करण्यास मनाई आहे. याविषयी मॅरियन बायोटेकने अद्याप कोणताही जाहीर खुलासा प्रसिद्ध केला नसला, तरी कंपनीच्या वेबसाईटमध्ये संबंधित औषध हे खोकला, घसा व नाक चोंदणे, घशात जळजळ होणे, डोकेदुखी, अंगदुखी आणि तापाशी संबंधित सर्दी-खोकला यांच्यावर वापरले जाते. संबंधित औषधावर हे औषध कोणाला देऊ नये, याविषयी सूचनाही अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. यानुसार अतिसंवेदनशीलता, काचबिंदू, डोळ्याचे विकार अथवा यकृतीचे विकार असणार्‍या रुग्णांना देऊ नयेत. तसेच 12 वर्षांखालील मुलांनाही संबंधित औषध देण्यास बंदी असल्याच्या सूचना अंतर्भूत करण्यात आल्या असल्याचे नमूद केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय औषधांचा दर्जा आणि अपाय यावर आक्षेप घेतलेले दोन महिन्यांतील हे दुसरे उदाहरण आहे.

Back to top button