पौड : फटाके वाजविणार्‍या ‘बुलेट’ थेट होताहेत जप्त; रोडरोमिओंवर पोलिसांची कारवाई | पुढारी

पौड : फटाके वाजविणार्‍या ‘बुलेट’ थेट होताहेत जप्त; रोडरोमिओंवर पोलिसांची कारवाई

पौड (ता. मुळशी); पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, क्लासेस तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी हिरोगिरी करणार्‍या रोडरोमिओंवर पौड पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. बुलेटमधून फटाके वाजवणार्‍या गाड्या आता थेट जप्त करण्यात येत आहेत. मुळशी तालुक्यात पिरंगुट आणि पौड या ठिकाणी महाविद्यालये, शाळा सुटल्यावर अनेक रोडरोमिओ पिरंगुट व पौड बसस्थानक परिसरात आपल्या बुलेट गाड्यांचे फटाके वाजवीत गाड्या फिरवत असतात.

पिरंगुट परिसरात तर या रोडरोमिओंमध्ये भांडणे होण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. वाहनात फेरबदल करून बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांचा आवाज काढणे, जोरजोरात हॉर्न वाजविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, मुलींच्या समोरून जाताना विचित्र वागणे असे प्रकार करणार्‍यांवर ही कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली आहे.

कारवाई पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष कुंभार, वाहतूक पोलिस अंमलदार राजेश गायकवाड,सिध्देश पाटील, पोलिस मित्र प्रशांत शिंदे, दादाराम चौधरी, विशाल मोकर, बंडू वाघमारे, महेश खरात, जालिंदर तापकीर आदींच्या पथक करीत आहे.

Back to top button