PAKvsNZ Test : न्यूझीलंडची पाकिस्तानवर आघाडी, लॅथम-विल्यमसनची शतकी खेळी | पुढारी

PAKvsNZ Test : न्यूझीलंडची पाकिस्तानवर आघाडी, लॅथम-विल्यमसनची शतकी खेळी

पुढारी ऑनलाईन डेस्क : PAKvsNZ Test : कराची कसोटीच्या तिस-या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. यजमान संघाच्या 438 धावांच्या प्रत्युत्तरात पाहुण्या किवी संघाने पहिल्या डावात 6 गडी गमावून 440 धावा केल्या आणि 2 धावांची आघाडी घेतली. टॉम लॅथम (113) आणि केन विल्यमसन (नाबाद 105) यांनी शानदार शतके झळकावली. त्याचवेळी डेव्हन कॉनवेने (92) अर्धशतक फटकावले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने कर्णधार बाबर आझम आणि आगा सलमानच्या खेळीमुळे 438 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या दिवसअखेर 165 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला या जोडीने 183 धावा केल्या. यावेळी डेव्हॉन कॉनवे बाद झाला आणि त्याला अवघ्या 8 धावांनी शतकाने हलकावणी दिली.

दुसरीकडे त्याचा साथीदार टॉम लॅथमने आघाडी सांभाळली आणि पाकिस्तानी गोलंदाजाचा मारा संयमाने खेळून काढला. त्याला माजी कर्णधार केन विल्यमसनने उत्कृष्ट साथ दिली. मात्र, या दोन्ही खेळाडूंना केवळ 48 धावांची भागीदारी करता आली. शतक झळकावणाऱ्या लॅथमला अबरार अहमदने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

कॉनवे आणि लॅथम बाद झाल्यानंतर पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केले. हेन्री निकोल्स (22) आणि डॅरिल मिशेल (42) यांच्या विकेट घेण्यात पाकच्या गोलंदाजांना झटपट यश मिळाले. यावेळी किवींची धावसंख्या 4 बाद 337 होती. अशा या कठीण परिस्थितीत विल्यमसनने पाकिस्तानवर पलटवार करण्यास सुरुवात केली. त्याने डॅरेल मिचेल (42) आणि टॉम ब्लंडेल सोबत संघाचा धावफलक हलता ठेवला. विल्यमसनने मिचेलसोबत 65 तर टॉम ब्लंडेलसोबत 90 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली आणि पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. यादरम्यान, विल्यमसनने शतक पूर्ण केले. दिवसाअखेर तो 122 चेंडूंत 11 चौकारांसह 105 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडने 6 बाद 440 धावांपर्यंत मजल मारली असून त्यांना पाकिस्तानविरुद्ध 2 धावांची आघाडी घेण्यात यश आले आले.

लॅथमचे 13 वे शतक

न्यूझीलंडचा सलामीवीर लॅथमने कारकिर्दीतील 13वे शतक झळकावले. तो आता किवी संघासाठी सर्वाधिक कसोटी शतक करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. याचबरोबर त्याने माजी क्रिकेटर जॉन राइट (12) आणि ब्रेंडन मॅक्युलम (12) यांना मागे टाकले आहे. याशिवाय लॅथम हा किवी संघासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारा सातवा खेळाडू बनला असून तो नॅथन अॅस्टल (4,702)च्या पुढे गेला आहे.

विल्यमसनचे 25 वे शतक

विल्यमसनने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीतील 25 वे शतक झळकावले. यापूर्वी, त्याने जानेवारी 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्धच शतक झळकावले होते. त्या डावात त्याने 238 धावा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी (722 दिवसांनी) त्याने शतकी आकडा गाठला आहे. अशातच विल्यमसनने कसोटी शतकांच्या बाबतीत ग्रेग चॅपेल, मोहम्मद युसूफ आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांना मागे टाकले. तसेच सर्वाधिक कसोटी शतकांच्या बाबतीत त्याने पाकिस्तानच्या इंझमाम-उल-हक आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली आहे.

पाकिस्तानचे गोलंदाज फेल…

पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या गोलंदाजांना विशेष काही करता आले नाही. अबरार अहमदने सर्वाधिक तीन तर नौमान अलीने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी मोहम्मद वसीमला एक बळी मिळाला. अबरारने 45 षटकांत 143 धावा दिल्या तर नौमानने 44 षटकांत 137 धावा दिल्या. वसीमलाही काही विशेष कामगिरी करता आली नाही आणि 24 षटकात 81 धावा देत फक्त एकच विकेट घेता आली.

Back to top button