पिंपरी : रिक्षा संघटनांच्या प्रयत्नांना यश ; रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

पिंपरी : रिक्षा संघटनांच्या प्रयत्नांना यश ; रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा : शहरात सुरू असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अ‍ॅटोरिक्षा संघटनांनी सतत मोर्चा आणि धरणे आंदोलने करून आपला रोष व्यक्त केला होता. याबाबत प्रशासनाने दखल घेत रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल केला असून, आता मोबाईलमधून अ‍ॅप काढण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे.

पुणे आरटीओच्या अधिकार्‍याने दिलेल्या फिर्यादीनुसार, कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, दोन वरिष्ठ अधिकार्‍यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईचे शहरातील रिक्षा संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
मात्र, शहरातील नागरिकांनी या सेवेला प्राधान्य दिले होते. त्यामुळेच शहरात या सेवेची मागणी वाढल्याचे दिसून येते. आता प्रवाशांना ही सेवा मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मी पिंपरी ते पुणे रेल्वे स्टेशन अपडाऊन करतो. अ‍ॅटो रिक्षाने प्रवास करायचा झाल्यास चारशे ते पाचशे रुपये भाडे एकाच प्रवाशाकडून आकारले जाते; मात्र बाईक टॅक्सीने प्रवास केल्यास ऐंशी ते शंभर रुपये भाडे आकारले जाते. यामध्ये माझे तीनशे रुपये वाचतात. त्यामुळे मला बाईक टॅक्सीसेवा योग्य वाटते. त्यामुळे शासनाने ही सेवा बंद करू नये.
                                                  – राकेश चव्हाण, नागरिक, पिंपरी.

मी एका कंपनीत आठ तास काम करतो. सोबतच मी बाईक टॅक्सी कंपनीची सेवादेखील नागरिकांना पुरवितो. ही सेवा स्वस्त असल्याने नागरिकांचाही याला चांगला प्रतिसाद आहे. यामुळे माझी आर्थिक बचत होते.
                                                         – प्रथमेश पाटील, निगडी

बाईक टॅक्सीसेवेमुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून आंदोलन पुकारले होते. त्यांच्या लढ्याला आता यश मिळाले आहे. बाईक टॅक्सीने शासनाचा कर बुडवून फसवणूक केली. ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल अप्लिकेशनमधून हे अ‍ॅप रद्द करावे. यासाठी पाठपुरावा करणार आहे.
                                    – बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत.

बेकायदा बाईक सेवेमुळे लाखो रिक्षाचालकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला होता. या विरोधात आम्ही आंदोलनदेखील केले होते; मात्र पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या मूळ मालकांवर गुन्हे दाखल केले. वर्षभरापासून आम्ही एकाच मागणीसाठी आंदोलने केली. परंतु कंपनीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यास प्रशासन तयार नव्हते. परंतु, आज उशिरा का होईना, प्रशासनाला जाग आली. व गुन्हे दाखल करण्यात आले.
                  – डॉ. केशव नाना क्षीरसागर,  अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला संघटना.

Back to top button