फडणवीस म्हणाले, सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल; पण… | पुढारी

फडणवीस म्हणाले, सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल; पण...

नागपूर : पुढारी वृत्तसेवा, महापुरुषांच्या अवमानावरून मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. महापुरुषांचा अवमान करणारे सत्ताधारी असल्याचे सांगत विरोधकांनी डागलेल्या तोफांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तिखट प्रत्युत्तर दिले. महापुरुषांबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विधानांचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. तसेच सावरकरांना भारतरत्न नाही मिळाला तरी चालेल; पण त्यांचा अवमान चालणार नाही, असे सुनावत याप्रश्नी ठाकरे गटाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महापुरुषांच्या अवमानप्रकरणी दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळातच सभागृहाचे कामकाज संपले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम २८९ अन्वये महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित केला. राज्यात वारंवार महापुरुषांचे अवमान करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज, राम आणि श्रीकृष्ण थोतांड आहे, असे तुमच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणतात. सात महिने गरोदर सीता मातेला जो सोडून जातो. आणि स्वतः शबरीसोबत बोरे खात बसतो, असे म्हणत तुमच्या नेत्या देवांचा अवमान करतात. कृष्ण पुन्हा अवतरत का नाही, तो कुठल्या तरी गोपिकेसोबत डेटवर गेला असावा, असे आमच्या कृष्णाबद्दल त्या बोलतात. यावर तुम्ही काहीही बोलत नाही, मूग गिळून गप्प बसता, असा भडीमार फडणवीस यांनी विरोधकांवर केला. यानंतर दोन्ही बाजूच्या गदारोळातच विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

महात्मा फुले, सावित्रीबाई, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झाला आहे. येथे नवनवीन कोलंबस जन्माला आले असून ते महाराष्ट्राचा इतिहासच बदलायला निघाले आहेत. अवमान करणारे हे सत्ताधारी आहेत. हे दुर्दैव आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही, असे दानवे म्हणाले. राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, ठाकरे गटाचे अनिल परब यांनीही या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

विरोधकांच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारावे हे योग्य नाही. सभागृहात वस्तुस्थिती मांडताना दोन्ही बाजूने मांडावी, असे फडणवीस म्हणाले. महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी विधेयक आणण्याची मागणी खा. उदयनराजे यांनी पत्रकाद्वारे केली होती. पण याच उदयनराजेंकडे वंशज असल्याचे पुरावे मागितले गेले.

वारकरी संप्रदायावर जातीयवादाचा ठपका ठेवला. संत एकनाथांबाबत विधाने केली. संजय राऊतांच्या आई या जिजाऊ, त्यांनी शिवबांसारखा पुत्र जन्माला घातला म्हणता. प्रत्येक आई महानच असते. पण अशी तुलना कशी होऊ शकते? असा प्रश्न करत फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विधानांची जंत्री मांडली. तर महापुरुषांच्या अवमानाची उदाहरणे देताना परब यांना सावरकरांचा विसर पडला. असे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा :

मस्क होतील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ! रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमीत्री मेदवेदेव यांचे भाकित

Maratha Aarakshan : आरक्षण रद्द झाल्याने मराठा उमेदवारांना आर्थिक मागास गटातून नियुक्ती – देवेंद्र फडणवीस

Back to top button