मंचर : अवैध दारू अड्ड्यावर कारवाई; 1 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

मंचर : अवैध दारू अड्ड्यावर कारवाई; 1 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त

मंचर (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : अडिवरे  येथील वांदरवाडी येथे बुब्रा नदीपात्रालगत अवैधरीत्या गावठी दारू बनवणार्‍या अड्ड्यावर घोडेगाव पोलिसांनी कारवाई केली. सुमारे 65 हजार रुपये किमतींची हातभट्टीची दारू, चाळीस हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस जवान जालिंदर रहाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. वांदरवाडी बुब्रा नदीपात्रालगत मंगेश भिकाजी वाघ, दशरथ दत्तु वाघ, यशवंत बाबू पवार (सर्व रा. अडिवरे- वांदरवाडी) व एक अनोळखी व्यक्ती हे रासायनिक पदार्थ वापरून गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती घोडेगाव पोलिसांना समजली होती.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा मारला असता ते पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून रासायनिक पदार्थ, दुचाकी असा एकूण 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वरील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी खेड विभाग सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक घोडेगाव जीवन माने, पोलिस अंमलदार जालिंदर रहाणे, नीलेश तळपे, नामदेव डेंगळे यांनी केली आहे. पुढील तपास सहायक फौजदार जीजाराम वाजे करत आहेत.

Back to top button