Indian Rupee : ‘या’ देशात आता थेट भारतीय रुपयात व्यवहार, जागतिक चलन होण्याच्या दिशेने रुपयाची आगेकूच | पुढारी

Indian Rupee : 'या' देशात आता थेट भारतीय रुपयात व्यवहार, जागतिक चलन होण्याच्या दिशेने रुपयाची आगेकूच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था, Indian Rupee : भारतीय रुपया हे जागतिक चलन होण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल पडले असून रशिया पाठोपाठ मॉरिशस आणि श्रीलंकेसोबत भारत रुपयांत व्यवहार करू शकणार आहे. या दोन्ही देशांतील बँकांना या रुपयांतील व्यवहारांसाठी व्होस्ट्रो अकाऊंट उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात असाच निर्णय ताजिकिस्तान, क्युबा, लक्झेम्बर्ग आणि सुदान यांच्या बाबतीत घेतला जाणार आहे. यामुळे उद्योग व्यापार व्यवहारांसह पर्यटनासारख्या क्षेत्रांतही या देशांसोबत डॉलरऐवजी थेट रुपयांत व्यवहार होणार आहे.

Indian Rupee : काही महिन्यांपूर्वी भारताने रशियासोबत थेट रुपयांत व्यवहार करण्याचा निर्णय घेतला होता व तो तेल खरेदीच्या काळात लगोलग अंमलातही आणला गेला. अशा व्यवहारांसाठी त्या देशांतील बँकांना व्होस्ट्रो अकाऊंट सुरू करण्याची आवश्यकता असते. रशियासोबतच्या व्यापारासाठी भारताने १२ व्होस्ट्रो अकाऊंट सुरू करण्याची परवानगी दिल्याने दोन देशांतील व्यापार अधिक सुरळीत व सोपा झाला.

जागतिक बाजारपेठेत सर्वत्र चालणारे चलन म्हणून अमेरिकन डॉलर ओळखले जाते. त्यामुळे कोणत्याही देशाला दुसऱ्या देशाशी व्यवहार करताना तो डॉलरमध्येच करावा लागतो. पण विदेशी चलनाची खास करून डॉलरची गंगाजळी कमी असल्यास त्याचा व्यापारावर परिणाम होतो. हे हेरूनच भारताने रुपयाला आंतरराष्ट्रीय चलन बनवण्याचे प्रयत्न सुरु केले. ते आता फळाला येत आहेत.

Indian Rupee : रिझर्व्ह बँकेने आता श्रीलंकेला पाच आणि मॉरिशसला एक अशा एकूण सहा व्होस्ट्रो अकाऊंट तयार करण्याची परवानगी दिली आहे. या पाठोपाठ ताजिकीस्तान, क्युबा, लक्झेम्बर्ग आणि सुदान यांच्याबाबतीत असाच निर्णय होणार आहे. त्या देशांसोबत सुरू असलेली बोलणी अंतिम टप्प्यात आहेत.

व्यापारासह पर्यटन क्षेत्रांतही डॉलरऐवजी थेट रुपयांत व्यवहार या निर्णयांमुळे आता करता येणार आहे.

Qutab Minar : कुतुब मीनारवर मालकी हक्क सांगणा-याची याचिका फेटाळली!

पुण्यासह नाशिक गारठले; तापमान 11.6 अंश सेल्सिअस

Back to top button