पुण्यासह नाशिक गारठले; तापमान 11.6 अंश सेल्सिअस | पुढारी

पुण्यासह नाशिक गारठले; तापमान 11.6 अंश सेल्सिअस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातील बहुतांश राज्यात दाट धुके आणि तीव्र थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. परिणामी, शुक्रवारपेक्षा शनिवारी राज्यातील किमान तापमानात घट होऊन किंचित थंडी वाढली आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागात कडाक्याची थंडी पडली असून, या भागातील किमान तापमानाचा पारा 10.3 अंशांंपर्यंत घसरला आहे.

पुणे आणि परिसरातदेखील रात्रीच्या थंडीत वाढ होऊन किमान तापमान 11.6 अंशांवर आला आहे. दरम्यान, उर्वरित राज्यात किमान तापमानाच्या सरासरीच्या आसपास राहिले आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतात शीतलहर मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. त्यामुळे पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, सिक्कीम ओडिशा,आसाम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कडाक्याची थंडी, तसेच दाट धुके पसरले आहे.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर या भागात कडाक्याची थंडी आणि दाट धुके राहणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा आता श्रीलंकेकडे सरकला आहे. तसेच, या पट्ट्याची तीव्र ता कमी झाली आहे. त्यामुळे आता उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे हळूहळू वाहू लागले आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढू लागली आहे. शनिवारी राज्यातील नाशिक भागाचे किमान तापमान कमी होऊन थंडीची तीव्रता वाढली आहे. उर्वरित राज्यात मात्र किमान तापमान सरासरीच्या आसपास राहणार आहे.

मुंबईचा पारा 16 अंशांवर, 24 डिसेंबर सर्वात थंड दिवस
मुंबईमध्ये थंडीने जोर धरल्याची प्रचिती शनिवारी आली. देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये किमान 16 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. 24 डिसेंबर हा आजवरचा या महिन्यातील सर्वात थंड दिवस ठरला. गेल्या वर्षी 29 डिसेंबरमध्ये कमीत कमी तापमान 17.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. कुलाबा वेधशाळेमध्ये किमान 18.8 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदले गेले. मागील वर्षाच्या तुलनेत डिसेंबरमधील किमान तापमानांमध्ये दोन अंश सेल्सियसचा फरक आहे.

Back to top button