पिंपरी : ख्रिसमसनिमित्त चर्च सजले ! | पुढारी

पिंपरी : ख्रिसमसनिमित्त चर्च सजले !

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  ख्रिसमस साजरा होणार असल्याने चर्चेसमध्ये आणि ख्रिस्तीबांधवांच्या घरात महिन्याभरापासून तयारी केली जात आहे. सध्या ख्रिसमसची तयारी पूर्ण झाली असून, पिंपरी चिंचवड शहरातील चर्चेस व ख्रिस्तीबांधवांची घरे रोषणाईने सजली आहेत.
ख्रिसमसनिमित्त शहरातील चर्चेसची रंगरंगोटी पूर्ण झाली असून सजावट अंतिम टप्प्यात आली आहे. चर्चेवर आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात चर्चेसच्या ठिकाणी झगमगाट पहायला मिळत आहे.

तसेच ख्रिस्तीबांधवांची घरेदेखील नटली आहेत. चर्चेसवर आणि घरांवर स्टार लावण्यात आले आहेत. ख्रिसमस ट्री सजविण्यात आला आहे. गव्हाणी तयार केली आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म गोठ्यात झाला असल्यामुळे गव्हाणी तयार करण्यात आली आहे. येशूच्या जन्माचा प्रसंग या गोठ्याच्या रूपात उभा केला आहे. या गोठ्यात येशूची आई मारिया, वडील, लहान येशू, मेंढ्या, गायी यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत.
घरामध्ये डोनट, केक व फराळ यांचा दरवळ येत आहे. ख्रिसमसनिमित्त दिल्या जाणार्‍या भेटवस्तूंची खरेदी केली जात आहे. एकूणच सर्व आनंदी वातावरण पहायला मिळत आहे.

Back to top button