जैविक बुरशी नाशक फायदेशीर | पुढारी

जैविक बुरशी नाशक फायदेशीर

ट्रायकोडर्मा मातीत आढळणारी जैविक बुरशी आहे. ही जैविक बुरशी मृदा रोग नियंत्रणासाठी अत्यंत उपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे. जैविक शेतीत रोग नियंत्रणासाठी बियाणे तसेच मृदेच्या संरक्षणासाठी ट्रायकोडर्माचा उपयोग केला जातो. ट्रायकोडर्माला मृदा आणि पिकांसाठी पोषक बुरशी म्हणून ओळखले जाते.

शेतीयोग्य जमिनीत चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी मातीत निर्माण होणार्‍या हानिकारक बुरशीपासून सुरक्षाकवच मिळण्यासाठी ट्रायकोडर्मा याचा वापर करतात. डाळी, पालेभाज्यांसहीत कपाशी जिरे इत्यादी पिकांचे सर्वाधिक नुकसान मृदेत बुरशीमुळे उद्भवलेल्या रोगांमुळे होते. या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी बीजसंरक्षण रसायने बियाण्यांना लावले जाते; मात्र रासायनिक बुरशीनाशकांचे दुष्परिणामही समोर आले आहेत. यावर उपाय म्हणून ट्रायकोडर्मा विकसित केले आहे.

ट्रायकोडर्मा हा जैविक पद्धतीतील सर्वात प्रभावी आणि यशस्वी रोग नियंत्रक आहे. ट्रायकोडर्मा बियाणांच्या उगवण्याच्या वेळी बियाण्यातील हानिकारक बुरशीचे आक्रमण व परिणाम रोखतो. यामुळे बियाणे सडून खराब होत नाही. ट्रायकोडर्माचा प्रभाव जमिनीत वर्षांनुवर्षे टिकून राहतो आणि रोगराईला आळा बसतो. यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. शेताच्या जमिनीत पिकांसाठी पोषक आणि पिकांसाठी हानिकारक अशा दोन प्रकारच्या बुरशी असतात. ज्या बुरशीचा पिकांना धोका असतो त्याचा नायनाट करण्यासाठी ट्रायकोडर्मा प्रभावी ठरतो.

पिकांच्या मुळाभोवती सुरक्षाकवच म्हणून ट्रायकोडर्मा भूमिका बजावत आहे. ट्रायकोडर्मा हा एक साचा आहे, जो मातीत आढळतो. पिकांना हानिकारक बुरशी नष्ट करून वनस्पतीला निरोगी बनविते. ट्रायकोडर्माचे अनेक प्रकार वनस्पती बुरशीजन्य रोगांविरुद्ध बायो-कंट्रोल एजंट म्हणून विकसित केले गेले आहेत. ट्रायकोडर्मा रोपांच्या अनेक प्रकारे रोगांचे व्यवस्थापन करते. यामध्ये जोस अ‍ॅटीबायोसिस, परजीवीवाद यांचा समावेश आहे. बायोकंट्रोल एजंट सामान्यतः मूळाच्या पृष्ठभागावर त्याच्या नैसर्गिक अधिवासात वाढतो आणि म्हणूनच विशेषतः मूळ रोगावर परिणाम करतो.

शेतजमिनीत अनेक प्रकारच्या बुरशी आढळतात. ट्रायकोडर्मा मातीत आढळणारी जैविक बुरशी आहे. ही जैविक बुरशी मृदा रोग नियंत्रणासाठी अत्यंत उपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे. जैविक शेतीत रोग नियंत्रणासाठी बियाणे तसेच मृदेच्या संरक्षणासाठी ट्रायकोडर्माचा उपयोग केला जातो. ट्रायकोडर्माला मृदा आणि पिकांसाठी पोषक बुरशी म्हणून ओळखले जाते.

ट्रायकोडर्माच्या अनेक जाती आहेत, त्यापैकी दोन जातींचा उपयोग आपल्या देशात खासकरून केला जातो. ट्रायकोडर्मा हरजियानम आणि ट्रायकोडर्मा विरिडी आधारित जैविक बुरशीनाशक शेतकर्‍यांसाठी वरदान ठरले आहे. ट्रायकोडर्माचा वापर नैसर्गिकद़ृष्ट्या सुरक्षित मानला जातो. मूळ सडणे, खोड सडणे इत्यादी रोगांवर ट्रायकोडर्मा नियंत्रण ठेवते.

ट्रायकोडर्माचा वापर करताना काही बाबी लक्षात घ्या. प्रति किलो बियाणे दराने 6-10 ग्रॅम ट्रायकोडर्म पावडर मिसळून बियानांमध्ये मिश्रण करावे. शेतात गांडूळ खत किंवा शेणखत घालताना त्यात ट्रायकोडर्मा मिश्रण करावे. ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम आणि 100 ग्रॅम शेणखताचे प्रतिलिटर पाण्यात विरघळून झाडाचे मूळ बुडवून त्याची लागवड केली जाते. त्यामुळे रोगापासून बचाव होतो आणि वनस्पतीची वाढ जोमात होते. उभ्या पिकात ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात विरघळून मूळाजवळ ठेवतात. ट्रायकोडर्मा पावडरची 10 ग्रॅम मात्रा 1 किलोग्रॅम गायीच्या शेणात मिसळून मिश्रण तयार करा. या मिश्रणात 1 किलोग्रॅम धान्य, डाळवर्गीय, आणि तेलवर्गीय बियाणे चांगल्या प्रकारे 20-25 मिनिटांपर्यंत भिजवून सावलीत ठेवावे. त्यानंतर पेरणी करावी. नर्सरीमध्ये जमिनीत वापर करायचा असल्यास 5-10 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर प्रति लिटर पाण्यात चांगल्याप्रकारे मिसळा आणि नंतर वापरा.

ट्रायकोडर्माचा वापर करताना काही खबरदारीही घेणे आवश्यक आहे. ट्रायकोडर्माचा उपयोग करताना 8-10 दिवसांपूर्वी तसेच 8-10 दिवसांनंतर कोणत्याही प्रकारचे रासायनिक बुरशीनाशक वापरू नये. ट्रायकोडर्मा आणि बुरशीनाशक एकाचवेळी वापरू नये. ट्रायकोडर्मा पॅकेटवर उत्पादन तारीख आणि एक्सपायरी तारीख नक्की तपासून पाहावी.

– विलास कदम

Back to top button