त्या तरूणाचा खूनच; शवविच्छेदन अहवालात आला धक्कादायक प्रकार समोर | पुढारी

त्या तरूणाचा खूनच; शवविच्छेदन अहवालात आला धक्कादायक प्रकार समोर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पूर्वी झालेला वाद आणि एकत्र दारू पिताना झालेल्या भांडणातून आपल्याच मित्राचा खून करणार्‍या तरूणाला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परेश शंकर कंदारे (29, वय रा. साईकृपा बिल्डींग, लोकमान्य कॉलनी कोथरूड) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्या खून प्रकरणी वसंत अवसरे (28, कोथरूड, लोकमान्यनगर) याला अटक करण्यात आली आहे. खून झालेला तरूण आणि आरेापी अवसरे हे दोघेही मित्र असून उच्च शिक्षित आहे.

तसेच दोघेही कॉलसेंटरमध्ये नोकरीस होते. दोघांमध्ये पुर्वी वाद झाले होते. परंतु त्यांची मैत्री होती. घटनेच्या दिवशी ते दारू पिण्यासाठी एकत्र बसले असताना त्यांच्यात पूर्वीच्या त्या भांडणावरून पुन्हा वाद झाले. याच वादातून अवसरे याने कंदारे यांचा गळा आवळून खून केला.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांना हा खूनाचा प्रकार असल्याचे परिस्थिती जन्य पुरव्यावरून समजले. याप्रकरणात आणखी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आल्यानंतर अहवालातही ही खुन केला असल्याचा प्रकार निष्पन्न झाला. त्यानंतर पोलिसांनी अवसरेला बोलवून त्याच्याकडे विचारणा केली. त्यावर त्याने दारू पिल्यानंतर आपल्याकडून हे कृत्य झाले असल्याचे सांगितले.

शवविच्छेदन अहवालात खुन केला असल्याचा प्रकार स्पष्ट झाला असून आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

                    – हेमंत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोथरूड पोलिस ठाणे.

Back to top button