पुणे : एकवीरा मंदिर विकासासाठी 39 कोटींचा आराखडा : पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती | पुढारी

पुणे : एकवीरा मंदिर विकासासाठी 39 कोटींचा आराखडा : पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एकवीरा मंदिराचे जतन, संवर्धन आणि परिसर विकास करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 39 कोटी 43 लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात दिली. प्राचीन मंदिरे, शिल्प व लेणींचे जतन-संवर्धन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते महामंडळाची निवड केली आहे. त्या अंतर्गत एकवीरा देवीच्या मंदिराचाही समावेश आहे.

राज्यातील प्राचीन मंदिरे, लेणी आणि शिल्पांच्या संवर्धनातून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर कार्ला येथील एकवीरा मंदिराबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पर्यटनमंत्री लोढा यांनी ही माहिती दिली.
लोढा म्हणाले, कार्ला येथील एकवीरा देवी मंदिर आणि परिसराचा विकास व संरक्षण करण्याबाबत श्री एकवीरा भाविक मंडळाने मे महिन्यात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

एकवीरा मंदिर पायथ्याकडे जाण्यासाठी 2.20 किलोमीटर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. मंदिर पायथ्याशी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्वच्छतागृह, उपाहारगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत महिला, पुरुष आणि शारीरिक विकलांग नागरिकांसाठी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. मंदिराचे जतन, संवर्धन आणि परिसर विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 39 कोटी 43 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

Back to top button