पिंपरी: शहरातील रस्त्यावर कचर्‍याचे ढीग, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष | पुढारी

पिंपरी: शहरातील रस्त्यावर कचर्‍याचे ढीग, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

पिंपरी : महात्मा फुलेनगर येथील सेक्टर क्रमांक 18/1 या परिसरात जागोजागी कचर्‍याचे ढीग पडले असून, येथील कचरा उचलण्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

परिसरातील रस्त्यांची झाडलोट करताना पालापाचोळा, कचरा ताबडतोब उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे आहे; मात्र परिसराची झाडलोट केल्यानंतर त्याचे संकलन केले जात नाही, अशी तक्रार कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंचचे अध्यक्ष यशवंत कण्हेरे यांनी केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आरोग्य विभागाकडून दैनंदिन स्वच्छतेच्या कामात मोठ्या प्रमाणात शिथिलता निर्माण झालेली आहे. आरोग्य विभागातून पिंपरी- चिंचवड शहर सुंदर स्वच्छ हरित दिसावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून यंत्रणा राबवली जाते.

आजच्या घडीला 14 ते 20 डिसेंबरपर्यंत कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंचतर्फे स्वच्छता अभियान राबवित असताना आरोग्य विभागाकडून म्हणावे तसे सहकार्य लाभत नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून आरोग्य विभागाकडून मातीचे ढिगारे उचलले जात नाहीत. वेगवेगळी कारणे दाखवली जातात. प्रभागातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाकडे तक्रार केली असता रोज वेगवेगळी माणसे ते पाहण्यासाठी येतात आणि हे आमचे काम नाही म्हणून सांगतात. जनसभेतही दखल नाही. निवडणुका लांबल्यामुळे लोकप्रतिनिधींचे वर्चस्व नाही. जनसभेतही प्रश्न सोडवले जात नसल्यास जनतेने काय करावे? असा सवाल त्यांनी केला आहे.

Back to top button