सीमाप्रश्‍नी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा : लोकसभेत खासदार अरविंद सावंत यांची मागणी | पुढारी

सीमाप्रश्‍नी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा : लोकसभेत खासदार अरविंद सावंत यांची मागणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतरही सीमाप्रश्‍न निवळत नसल्याचे दिसून आले आहे. आज, सोमवारी (दि.१९) शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने खासदार अरविंद सावंत यांनी शून्य काळात सीमाप्रश्‍नाचा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांचा अपमान करीत आहेत, असा दावाही यांनी या वेळी केला.
गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करूनही कर्नाटक सरकारची महाराष्ट्र एकीकरण समितीविरुद्ध दडपशाही सुरु आहे.  महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशाला केलेला प्रतिबंध हा घटनेवरील हल्ला आहे, असा  आरोप सावंत यांनी लोकसभेत केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांचा अपमान करत आहेत, असा दावाही त्‍यांनी केला.
महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी यावर सुनावणी सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरू असून, महाराष्ट्र एकीकरण समितीला मागील अनेक वर्षांपासून निदर्शनासाठी परवानगी दिली जाते. त्यासाठी मंडपही दिला जातो. असे असताना दिलेली परवानगी काल अचानक रद्द करण्यात आली आणि आंदोलनस्थळ असलेला त्यांचा मंडप तोडण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. शिवाय कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्याला कर्नाटकमध्ये येण्याला प्रतिबंध केला आहे. हा थेट घटनेवर हल्ला आहे, असे सावंत यांनी सभागृहाला निदर्शनास आणून दिले.
दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमाप्रश्‍नावर मध्यस्थी केली होती. असे असताना त्यांचाही अवमान होतो आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशाचे पालन करत नाही. यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध करत केंद्र सरकारने या प्रश्‍नी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही खासदार सावंत यांनी या वेळी केली.
हेही वाचा :

Back to top button