बोम्मईंच्या ट्वीटची समिती चौकशी करणार : दीपक केसरकर | पुढारी

बोम्मईंच्या ट्वीटची समिती चौकशी करणार : दीपक केसरकर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या ६० वर्षात सीमाभागातील गावांचे प्रश्न निकाली काढण्यास सरकारला अपशय आल्याची कबुली देत सीमावादाचा विषय केवळ श्रेयवादासाठी तापविण्यात येत असल्याचा आरोप शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या ट्वीट अकाऊंट संदर्भात समिती तपासणी करेल, असेही ते म्हणाले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या ट्वीटमुळे सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यातील तीन मंत्र्यांचा समावेश असलेल्या समिती गठित केली. ही समिती दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी भेटू शकणार आहे. गृहमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. बोम्मईच्या ट्वीट अकाउंट संदर्भात समिती तपासणी करेल. सीमाभागातील ८०० हून अधिक गावांचा प्रश्न आहे. या गावांमधील नागरिकांना प्रथमच सुविधा उपलब्ध करून देणार आहे. १४ वर्ष वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वास्तव्य पुराव्यासह इतर सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना केसरकर म्हणाले की, ते युवा आहेत. पहिल्यांदा आमदार व मंत्री झाले. त्यांना घटनाबाह्य काय व घटनात्मक काय याचे ज्ञान नाही. सहानुभूतीवर सरकार आणण्याची सवय आहे, असा टोला त्यांनी लगावला. ते कधीच मंत्रालयात आले नाहीत. मंत्र्यांना वेळ दिला नाही. त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणेच राज्याच्या हिताचे आहे, असेही ते म्हणाले.

धान उत्पादकांना मिळणार लाभ

अधिवेशनातून विदर्भातील नागरिक, शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा आहे. विदर्भातील जिल्ह्यांचा मुख्यमंत्री आढावा घेतील. मुख्य पीक असलेल्या धानासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शाईफेकनंतर विधानभवनात पेनवर बंदी

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. यंदा प्रथमच विधान भवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिंबध घालण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून शाई पेनवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.

हेही वाचा :

Back to top button