लोणी-धामणी : वातावरणाने डाळिंब उत्पादक चिंतेत | पुढारी

लोणी-धामणी : वातावरणाने डाळिंब उत्पादक चिंतेत

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून थंडीचा लपंडाव सुरू आहे. त्याचा परिणाम गहू, हरभरा या पिकांबरोबर फळपिकांवर होत असून, शेतकर्‍यांचा फवारणीचा खर्च वाढला आहे. कांद्यावर करपा, द्राक्षावर डावणी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये दिवाळीनंतर थंडीने जोर धरला होता. त्यामुळे गहू, हरभरा, डाळिंब ही पिके जोमात होती. डाळिंबासह इतर फळबागांना हे वातावरण अनुकूल होते. गेल्या चार दिवसांपासून थंडी कमी झाली आहे.

ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे जवळपास थंडी बेपत्ता झाली आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या डाळिंब पीक फुलोर्‍यात आले आहे. ढगाळ वातावरणामुळे रोगकिडीचे व फुलकिडीचे प्रमाण वाढले आहे. बदललेल्या वातावरणामुळे डाळिंब पिकावर मावा, भुरी, बुरशीजन्य, तेल्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याने डाळिंब उत्पादक चिंतेत आहेत. अवकाळी पाऊस, नियमित फवारणी, शेंडे फुटवा काढणे, जलव्यवस्थापन, वेळोवेळी खतांची मात्रा याबरोबर अनेक समस्यांचा डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना सामना करावा लागत आहे.

Back to top button