पुणे : बळीराजाला महावितरणचे बळ; दीड महिन्यात 9 हजार 604 कृषिपंपांना नवीन जोडण्या | पुढारी

पुणे : बळीराजाला महावितरणचे बळ; दीड महिन्यात 9 हजार 604 कृषिपंपांना नवीन जोडण्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे प्रादेशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत नादुरुस्त शेतपंपांचे रोहित्रे बदलण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, गेल्या दीड महिन्यात 9 हजार 604 कृषिपंपांना वीज जोडण्या दिल्या आहेत. तर 2036 नादुरुस्त रोहित्रे बदलण्यात आली आहेत. रब्बीच्या हंगामात विक्रमी उत्पादन होण्यासाठी तत्काळ वीजजोडणी व तातडीने नादुरुस्त रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) बदलण्यासाठी दिलेल्या आदेशाची पुणे प्रादेशिक विभागात युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्यात येत आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिलेल्या असून, महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे नादुरूस्त रोहित्रे बदलण्याच्या कामाचा दैनंदिन आढावा घेत आहेत.

येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत ताकसांडे यांनी शेतकर्‍यांना कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोटेशनची रक्कम भरून प्रलंबित असलेल्या वीजजोडण्या मार्च 2023 पर्यंत देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. विविध योजनांसह क्षेत्रीय कार्यालयांना निधीदेखील उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्यात कोणतीही अडचण नाही, असेही ताकसांडे यांनी स्पष्ट केले.

नोव्हेंबरमध्ये जवळपास 8 हजार कृषिपंप ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या, तर डिसेंबर महिन्यात जवळपास 1 हजार 611 नवीन कृषिपंपाना वीजजोडण्या देण्यात आल्या असून, मार्च 2023 पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांना वीजजोडण्या देण्यासह मागेल त्याला तत्काळ वीजजोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठरविल्याची माहिती पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक (प्रभारी) अंकुश नाळे यांनी दिली आहे.
पुणे प्रादेशिक विभागात 29 नोव्हेंबरपर्यंत 1145 नादुरुस्त रोहित्रे नादुरुस्त होती.

त्यापैकी 1139 रोहित्रे ही तत्काळ बदलण्यात आली. मात्र, शेतात पीक उभे असल्याने 6 जागीचे रोहित्र बदलता आलेले नाही. तर 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत 1 हजार 153 रोहित्रे नादुरुस्त असून, त्यापैकी 897 रोहित्रे ही तत्काळ बदलून मिळालेली आहेत, तर उर्वरित 256 रोहित्रे बदलण्याची कारवाई युद्धपातळीवर करण्यात येत आहे.

वीजचोरीमुळे जवळपास 2 हजार 298 रोहित्रे नादुरुस्त झालेले आहेत. त्यामुळे कृषिपंप ग्राहकांनी वीज चोरी करू नये. मागेल त्याला त्वरित वीजजोडणी महावितरणकडून देण्यात येत असून, ग्राहकांनी महावितरणकडे त्वरित वीजजोडणीसाठी अर्ज करावा तसेच कृषिपंप ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

नादुरुस्त रोहित्रे त्वरित बदलून मिळावे यासाठी मुख्य कार्यालयातर्फे क्षेत्रीय कार्यालयांना मुबलक प्रमाणात ऑइल उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक (प्रभारी ) अंकुश नाळे हे नादुरुस्त रोहित्रांचा व कृषिपंप वीज जोडणीचा दैनंदिन आढावा घेत आहेत.

 

Back to top button