‘जिरेगाव’च्या जलवाहिनीचा प्रश्न रेंगाळलेलाच | पुढारी

‘जिरेगाव’च्या जलवाहिनीचा प्रश्न रेंगाळलेलाच

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील जिरेगाव तलावापर्यंत तीन किलोमीटरची जलवाहिनीचा महत्त्वपूर्ण प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नसल्याने गतवर्षी प्रमाणेच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. मात्र, याचे कोणाला काहीच गांर्भीय नसल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाचे अधिकार्‍यांनी ’तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या म्हणी प्रमाणे न वागता जलवाहीनीचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची गरज आहे.

जनाई शिरसाई योजनेतून मिळणारे पाणी व पावसाच्या पाण्यावर जिरेगावकरांचे जनजीवन अवलंबून आहे. हेे पाणी वर्षभर वापरले जाते. तलावाची पाणी साठवण क्षमता 60 दश लक्ष घन फूट आहे,एकूण क्षेत्र 2169.28 हे. आर. इतके आहे.2 हजार 278 इतकी लोकसंख्या आहे. शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ( सन 2021) तलाव पाण्याविना कोरडाठाक पडला होता. जनाई शिरसाई योजनेतून तलावात पाणी सोडण्याची वारंवार मागणी केली. मात्र, शेवटपर्यंत पाणी तलावापर्यंत पोहचले नाही. विहिरीतील पाण्याने तळ गाठला होता. मागणी करून देखील संपूर्ण उन्हाळा संपला तरी टॅकर सुरू केला नाही.

जिरेगावकरांना तब्बल 10 महिने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले. वाड्यावस्त्यावरील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. याकाळात उपाययोजन करण्याऐवजी अधिकारी वेळ काढू पणा करत असल्याचे आरोप झाले. अखेर पावसाने कृपा दाखवली. पाऊस चांगला झाल्याने तलाव पाण्याने भरलेला आहे. डिसेंबर महिना सुरू असून गेल्या वर्षीपेक्षा यंदाची पाण्याची पातळी समाधानकारक आहे. जनाई शिरसाई योजनेतून सोडलेले पाणी तलावापर्यंत पोहचत नसल्याची नेहमीचीच समस्या आहे.

योजनेतून मिळणारे पाणी तलावापर्यंत व्यवस्थित पोहचण्यासाठी व पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनाई उपसासिंचन योजनेवरील डाव्या कालवा (वाघदरा) ते जिरेगाव तलावापर्यंत तीन किलोमीटर जलावाहीनी टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे टंचाईच्या काळात योजनेतून मिळणार्‍या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. यावर तडतडीने काम करणे अपेक्षित आहे. सध्या पाणी शिल्लक असले तरी उन्हाळ्यातील पाणी टंचाई संभाव्य धोका लक्षात घेता तातडीने उपाययोजन करण्याची गरज आहे.

Back to top button