पिंपरी : युद्धजन्य परिस्थितीत शिक्षणासाठी धडपड ; युक्रेनमधील विद्यापीठांची ऑफलाइन शिक्षणाची सक्ती | पुढारी

पिंपरी : युद्धजन्य परिस्थितीत शिक्षणासाठी धडपड ; युक्रेनमधील विद्यापीठांची ऑफलाइन शिक्षणाची सक्ती

वर्षा कांबळे :

पिंपरी : पुढील शिक्षण हे ऑफलाइनच घ्यावे लागेल, असा निर्णय युक्रेनमधील विद्यापीठांनी घेतल्यानंतर युद्धजन्य परिस्थितीमध्येदेखील पिंपरी- चिंचवड शहरातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी हे युक्रेनच्या आसपास शहरात मुक्कामी राहून शिक्षण घेत आहेत. तर काहीजण युक्रेनकडे जाण्याच्या मार्गावर आहेत. युद्धजन्य परिस्थितीत स्वत:चा जीव धोक्यात घालून शिक्षणासाठीची त्यांची ही धडपड वाखाणण्याजोगी आहे. युक्रेन व रशिया या दोन देशात युद्ध सुरू होऊन सुमारे नऊ महिन्यांचा कालावधी उलटला. युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे शहरातील जवळपास 30 विद्यार्थी अडकले होते. तर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीशी तोंड देत होते. बॉम्ब हल्ले, गोळीबार यांचे वृत्त ऐकून पालकांचा जीव टांगणीला लागला होता. बर्‍याच विद्यार्थ्यांपर्यंत कोणतीही मदत पोहोचत नव्हती. विद्यार्थी मदतीसाठी सोशल मीडियावर मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करा, अशी साद घालत होते.

देशातून व राज्यातूनदेखील युद्धपातळीवर भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी हेल्पलाईनदेखील उपलब्ध करून त्यासाठी हेल्पलाईनदेखील उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत विद्यार्थी घरूनच ऑनलाइन शिक्षण घेत होते.

युक्रेनजवळील परिसरात शिक्षण

मायदेशी परत आल्यानंतर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होते; मात्र आता ऑफलाइन शिक्षणच घ्यावे लागेल, म्हणून तेथील विद्यापीठाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा युक्रेन गाठावे लागले आहे. काही विद्यार्थी हे युक्रेनपासून थोड्या लांब जॉर्जिया, टर्नोपिल, पोलंड अशा ठिकाणी राहून शिक्षण घेत आहेत. तर काहींनी शिक्षणासाठी राज्यच बदलले आहे. काही दिवसांनी तेदेखील युक्रेनला जाण्यास निघणार आहेत.

जबाबदारी महाविद्यालयांवर

ऑफलाइन शिक्षण घेत असताना महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्या त्या महाविद्यालयांनी घेतली आहे. युद्धाच्या वेळी मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले आणि गोळीबार झाल्यास सायरन वाजल्यानंतर महाविद्यालयाच्या बंकरमध्ये विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

मी पूर्वी जेप्रोजिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मेडिकलच्या 4 थ्या वर्षात शिकत होते. विद्यापीठाने ऑनलाइन शिक्षण घेता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने मी तेथील जवळच्या जॉर्जियामध्ये अ‍ॅडमिशन घेतले आहे. लवकरच मी जॉर्जियामध्ये जाणार आहे. आता सध्या जेप्रेजिया सीआययू युनिव्हर्सिटीमध्ये अ‍ॅडमिशन घेतले आहे.
                                                          -श्रुती ढमाले, जुनी सांगवी

मी किव्हमध्ये शिकत आहे. बहुतांश विद्यार्थी सध्या भारतातून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. मात्र, त्याची पदवी ग्राह्य धरली जाणार नाही; तसेच दोन वर्षे इंटर्नशीप करावी लागेल. त्यामुळे आम्ही युक्रेनला जाण्याचा निर्णय घेतला. युद्धजन्य स्थिती असूनही युक्रेनच्या बॉर्डरवरील शहरांमध्ये सुरक्षित वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थिती असेल तरी याठिकाणी सरकारकडून सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. तसेच याठिकाणी युद्ध असल्याने वैद्यकीय सुविधेवर ताण आहे. त्यामुळे जखमी सैनिकांच्या सेवेसासाठी आमच्या शिक्षकांबरोबर आम्हाला जावे लागते. पण अशा परिस्थितीमध्ये सेवा देण्याचा आम्हांला आनंद आहे. हे आमचे कर्तव्य पण आहे.

                                                               -आरती उणेचा, चिंचवड

Back to top button