भारतीय शास्त्रज्ञांनी लावला ब्रह्मांडातील नव्या स्फोटाचा शोध | पुढारी

भारतीय शास्त्रज्ञांनी लावला ब्रह्मांडातील नव्या स्फोटाचा शोध

सिमला : सूर्यमालेत अनंत घटना घडत असतात आणि वैज्ञानिकांपुढे त्यामुळे नेहमीच नवनवी आव्हाने उभी ठाकतात. ब्रह्मांडाचे कोडे उलगडणे हे खरोखरच महाकठीण काम आहे. आता नैनिताल येथील आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हायनमेंटल सायन्सेस या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी 1 अब्ज प्रकाश वर्ष एवढ्या विशालकाय अंतरावर घडलेल्या एका विस्फोटाचा शोध लावला आहे.

गॅमा किरणांद्वारे हा स्फोट झाल्याचे या शास्त्रज्ञांच्या गटाने म्हटले आहे. 3.6 मीटर व्यासाच्या दुर्बिणीचा वापर हे द़ृश्य पाहण्यासाठी करण्यात आला. दोन तारे परस्परांसमोर येऊन नंतर त्यांची जोरदार टक्कर होते, असे या स्फोटाचे स्वरूप असल्याचे दिसून आले. नेचर डॉट कॉम या संकेतस्थळावरही हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

शास्त्रज्ञांच्या गटाचे प्रमुख डॉ. शशिभूषण पांडे यांच्या मते ब्रह्मांडातील ही अतिशय दुर्मीळ मानली जाणारी घटना होय. कारण, तार्‍यांच्या टकरीतून निर्माण झालेली ऊर्जा सूर्याच्या ऊर्जैपेक्षा कैक पटीने अधिक आहे. हा विस्फोट केवळमिनिटापुरताच झाला. मात्र, त्यातून निर्माण झालेल्या अद्भुत प्रकाशामुळे शास्त्रज्ञांचे डोळे दिपले. आता शास्त्रज्ञांचा हा गट ब्रह्मांडातील आणखी रहस्यांचा शोध लावण्यासाठी संशोधन करणार आहे.

राहुल गुप्ता, अमर आर्यन, अमित कुमार आणि डॉ. कुंतल मिश्रा या खगोलशास्त्राच्या विद्यार्थ्यांनीदेखील हा विस्मयकारक विस्फोटावर अभ्यास सुरू केला आहे. सूर्यमालेतील या स्फोटाचा शोध प्रथमच लागल्यामुळे जगभरातील खगोल वैज्ञानिकांची उत्सुकता चाळवली गेली आहे. नजीकच्या काळात आणखी अशा स्वरूपाच्या घटनांवर आम्ही संशोधन करणार आहोत, असे या युवा अभ्यासकांनी सांगितले. हा विस्फोट दुर्बिणीतून पाहणे शक्य झाले हे खरे असले तरी ब्रह्मांडात अशा अनेक घटना घडत असतात. त्यांचे विश्लेषण कसे करायचे यावर भारतीय खगोल शास्त्रज्ञ विचार करू लागले आहेत. एक खरे की, गेल्या काही वर्षांपासून भारताने खगोल शास्त्रातही प्रगती करण्याचा सपाटा लावला आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button